मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे लसीकरण केंद्र सुरु करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले असले तरी यामध्ये शालेय इमारती वगळूनच हे लसीकरण केंद्र सुरु केली जाणार आहेत. महापालिकेची आरोग्य केंद्र, प्रसुतीगृह, रुग्णालये तसेच समाज कल्याण केंद्र आदी ठिकाणीच लसीकरण केंद्र सुरु करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले असून ज्या भागांमध्ये यापैकी काहीच सुविधा केंद्रे नसलेल्या ठिकाणीच शालेय इमारतींचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे शाळांमधील केंद्राच्या परवानगी नाकारत प्रशासनाकडून ‘नापास’ केले जात आहे.
शाळांमध्ये लसीकरण केंद्र सुरु करू न देण्याचे आयुक्तांचे निर्देश
मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे लसीकरण केंद्र सुरु करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले. मात्र, आपल्या विभागात लसीकरण सुरु व्हावे असे प्रत्येक नगरसेवकांची इच्छा आहे. त्यामुळे अनेक नगरसेवकांनी शाळांमध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. परंतु काही नगरसेवकांची मागणी फेटाळतानाच काहींची मागणी स्वीकारली गेली आहे. कांदिवलीमधील चारकोप सेक्टर एकमध्ये माजी शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांना शाळेत लसीरकण सुरु करण्यास परवानगी दिली. पण बाजुच्याच प्रभागातील नगरसेविका प्रियंका मोरे यांना मात्र शाळेतील लसीकरण केंद्राला परवानगी नाकारण्यात आली आहे. तर भांडुपमध्ये एस व टी प्रभाग समिती अध्यक्षा दिपमाला बढे यांनाही शाळेतील लसीकरण केंद्राला परवानगी देण्यात आली आहे. तर शेजारच्या प्रभागातील नगरसेविका सारीका मंगेश पवार यांच्याही मागणीनुसार कांजूरमार्ग शाळेत लसीकरण केंद्र उभारण्यासाठी मंडप उभारण्यात आला. त्यामुळे याठिकाणी लवकरच केंद्र सुरु होईल. मात्र, यापूर्वीच ज्या शाळांना परवानगी दिलेली आहे, त्या शालेय इमारती वगळता अन्य शाळांमध्ये लसीकरण केंद्रांसाठी परवानगी न देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शक्यतो शाळांमध्ये लसीकरण केंद्र सुरु करू न देण्याचे आयुक्तांचे निर्देश आहेत. ज्या भागांमध्ये दवाखाने,आरोग्य केंद्र, प्रसुतीगृह, रुग्णालय आदी सुविधा नसेल तिथेच शेवटचा पर्याय म्हणून शाळेतील लसीकरण् केंद्राला परवानगी दिली जाईल. परंतु अन्य सुविधा केंद्र असतील तर शाळेतील लसीकरण केंद्रांना शक्यतो परवानगी दिली जाणार नाही. कारण लसीकरण मोहिम ही दिर्घकाळ चालणारी असून यामुळे शाळा सुरु करताना कोणत्याही अडचणी येवू नये याची काळजी प्रशासनाच्यावतीने घेतल्या जात आहे,असे ते म्हणाले.
(हेही वाचा : उद्घाटनासाठी मुलुंड कोविड सेंटरमधील आयसीयू बेडची सुविधा एक दिवस उशिराने सुरु?)
Join Our WhatsApp Community