लसीकरणाची बदललेली वेळ कोणती? जाणून घ्या!

लस साठ्याच्या उपलब्धतेत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील वेगवेगळ्या गटातील पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

156

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर कामकाजाच्या दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी पाचवाजेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे. तसेच दुसऱ्या दिवसाची लसीकरणसंबंधी माहिती दररोज सायंकाळी साडेपाच वाजता समाजमाध्यमातून प्रसारित केली जाणार आहे.

संकेतस्थळावर लसीकरण केंद्राची माहिती देणार!

देशभरात १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ संसर्ग प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. लस साठ्याच्या उपलब्धतेत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील वेगवेगळ्या गटातील पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. मुंबईतील लसीकरण केंद्र आणि तेथे नियोजित सत्रांची माहिती प्रसारमाध्यमांसह मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत समाजमाध्यम संकेतस्थळावरून दररोज सायंकाळी प्रकाशित देखील केली जाते. यामध्ये ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी समाजमाध्यमांचा समावेश आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आणि लसीकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असताना अंमलबजावणीत सुसूत्रता आणता यावी यासाठी आता सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांची कामकाजाच्या दिवशी (म्हणजेच रविवार/लस साठा नसल्यास लसीकरण बंद असल्याचे दिवस वगळून) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. तर दुसऱ्या दिवसाच्या सत्रांची माहिती आदल्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता प्रसारित करण्यात येईल. अर्थात उपलब्ध लस साठ्याच्या सापेक्ष ही वेळ असेल. तसेच निश्चित केलेल्या वेळेत काही बदल होणार असेल तर त्याची आगाऊ माहिती प्रसारमाध्यम आणि समाज माध्यमातून मुंबईकर नागरिकांपर्यंत पोचविण्यात येईल. सर्व मुंबईकर नागरिकांनी याची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

(हेही वाचा : आधी बैठकीकडे पाठ, नंतर निवेदनावर बोळवण! शिक्षणमंत्र्यांचा अजब कारभार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.