राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अजूनही कमी होताना दिसत नाही. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेचा परिणाम दीर्घकाळ झाला असल्याचे चित्र सध्या राज्यात आहे. फेब्रुवारी महिन्यात सुरु झालेली दुसरी लाट ४ महिने उलटले तरीही राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे. तेथील परिस्थिती चिंताजनक आहे.
चाचण्या वाढवणे, निर्बंध अधिक कडक करावे लागणार!
दुसऱ्या लाटेत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुमारे ६० हजार नव्या रुग्णांची नोंद झाली होती. एप्रिलमध्ये रुग्ण वाढीने उच्चांक गाठला. रुग्णसंख्या थेट साडेचार लाख झाली. त्यानंतर मे महिनापासून रुग्ण संख्या कमी होऊ लागली. ती एक लाखापर्यंत आली. जूनमध्ये यात बरीचशी घट झाली. मात्र तरीही राज्य सरकारने निर्बंध कायम ठेवले. सर्व जिल्ह्यांचा दर आठवड्याला पॉझिटिव्हिटी रेट पडताळून निर्बंध कडक ठेवायचे कि सैल करायचे, ही कार्यपद्धत लागू केली. त्याप्रमाणे आजही पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हा भाग अजूनही चिंताग्रस्त आहे. या ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट हा ५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या आठ जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाण पाच टक्क्यांहूनही अधिक आहे, तेथे बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध कमी प्रमाणात घेतला जात आहे. तसेच चाचण्यांचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे या दोन्हींवर अधिक भर द्यावा लागणार आहे. तसेच बाधितांचे प्रमाण अधिक (रेड झोन) असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध अधिक कठोर करणे आवश्यक आहे.
(हेही वाचा : ‘शिखर सावरकर २०२०’ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न!)
काय म्हणते आकडेवारी?
कोल्हापुर जिल्ह्यात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट १०.२४ टक्के बाधितांचे प्रमाण आहे. त्या खालोखाल सातारा (९.१४ टक्के), सांगली (८.८१ टक्के), रायगड (७.८८ टक्के), पुणे (७.६८ टक्के), रत्नागिरी (७.२९ टक्के), सिंधुदुर्ग (६.५५ टक्के), पालघर (५.२६ टक्के) आणि बुलढाणा (४.५७ टक्के) या जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाण अधिक आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे या जिल्ह्यांतील संसर्ग दर जूनच्या शेवटच्या आठवड्यात काही अंशी घटला होता. परंतु २७ ते ३ जुलै या आठवड्यात मात्र पुन्हा वाढला. कोल्हापूर आणि साताऱ्यातील बाधितांचे प्रमाण या आठवड्यात अनुक्रमे तीन आणि दोन टक्क्यांनी वाढल्यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.
Join Our WhatsApp Community