कोरोनाच्या विरोधात लस आली, कोरोनाच्या विरोधात प्रतिकार शक्ती वाढली, कोरोना बरा होऊ शकतो, रुग्ण संख्या घटली अशी वाक्य सध्या कानावर वारंवार पडत आहे. तसेच त्याअनुषंगाने व्यवहारही सुरु झाले आहेत. पण भारतीयांसाठी चिंता करणारी बातमी आली आहे. कोरोनाचे सलग तिसरे वर्ष सुरु होत आहे. २०२०, २०२१ या वर्षांत कोरोनाने थैमान घातले. आता कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. युरोपातील ५३ देशांमध्ये कहर माजवला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा दिला आहे.
५ लाख जणांना जीव गमावू शकतात
युरोपसाठी वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यू चिंतेचा विषय आहे. फेब्रुवारी २०२२ पर्यंत युरोप आणि मध्य आशियात आणखी पाच लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा युरोप कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. सध्या अनेक भागात कोरोनाच्या संसर्गात वाढ झाली आहे. युरोपात जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक असलेल्या हॅन्स क्लूज यांनी सांगितले की, युरोपासह मध्य आशियातील ५३ देशांमध्ये सध्या संसर्गाची स्थिती ही चिंताजनक आहे. आता ज्या पद्धतीने संसर्गाचा वेग आणि मृत्यूचे प्रमाण आहे ते पाहता अशीच स्थिती राहिल्यास पुढच्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत ५ लाख जणांना जीव गमवावा लागू शकतो.
(हेही वाचा : आता आरेतील ‘त्या’ तिसऱ्या बिबट्यावर राहणार ‘नजर’!)
२४ हजारांहून अधिक मृत्यू
गेल्या आठवड्याभरात ५३ देशांमध्ये कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. क्लूज यांनी सांगितले की, युरोपात या आठवड्यात १८ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण सहा टक्क्यांनी अधिक आहे. तर कोरोनामुळे आठवड्याभरात २४ हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा १२ टक्क्यांनी जास्त आहे. युरोपात सलग पाच आठवडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. १ लाख लोकांमागे १९२ रुग्ण सध्या सापडत आहेत. जर्मनीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत असून गुरुवारी ३३ हजार ९४९ नव्या रुग्णांची नोंद झाली. नव्या रुग्णांच्या बाबतीत शुक्रवारी गेल्या वर्षीचा उच्चांक मागे टाकला. शुक्रवारी जर्मनीत ३७ हजार नवे रुग्ण आढळले. ज्यांनी कोरोनाची लस घेतलेली नाही अशा लोकांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण जास्त आहे, असे आरोग्यमंत्री जेन्स स्पॅन यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community