राज्यभरातील बीए व्हेरिएंटचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात आता रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. शनिवारपासून पुण्यातील रुग्णसंख्या पाच हजारांच्या खाली जाण्यास सुरुवात झाल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाकडून नोंदवले गेले. मात्र रविवारी बीए व्हेरिएंटचे पुन्हा पुण्यात रुग्ण आढळल्याने सक्रीय रुग्णांची संख्या पाच हजारापर्यंत पोहोचली होती. सोमवारी पुण्यातील रुग्णांच्या आकडेवारीत पुन्हा घट दिसून आली. आता पुण्यात केवळ ४ हजार ९८९ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार दिले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
( हेही वाचा : गौताळा अभयारण्याला मोकाट जनावरांचा, पर्यटकांचा धोका )
नागपूर आणि नाशिकमध्ये रुग्णांची संख्या वाढतेय
गेल्या आठवड्याच्या अखेरपासून नागपूरातील वाढती रुग्णसंख्या हजारीपार कायम आहे. सध्या नागपूरातील रुग्णसंख्या दीडहजारांच्याही पलीकडे गेल्याचे आरोग्य विभागाच्या नोंदणीत दिसून आले. नागपूरात १ हजार ४९२ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यातुलनेत आता नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्या हजारांच्याजवळ येऊ लागल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यात ७१२ रुग्णांना उपचार दिले जात आहेत. ठाण्यातही सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ९८७ वर दिसून आली.
डिस्चार्ज रुग्णसंख्या वाढली
सोमवारी राज्यात ७८५ कोरोना रुग्ण आढळलेले असताना गेल्या २४ तासांत ९३७ कोरोनाच्या रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दोनशेहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज दिल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७.९८ टक्क्यांवर सुधारल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
हजारीपार रुग्णसंख्या असलेले जिल्हे आणि रुग्णसंख्या
पुणे – ४ हजार ९८९, नागपूर – १हजार ४९२, मुंबई – १ हजार ८२६