मुंबई महापालिकेच्या मालाड आणि भायखळा येथील जंबो कोविड सेंटरमधील घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी आपला चौकशी अहवाल मागील आठवड्यात महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांना सादर केला. मात्र, या अहवालानंतर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता आयुक्तांनी हा अहवाल लाल फितीत बांधून ठेवला आहे. त्यामुळे याप्रकरणी मनसे काय भूमिका घेतेय याकडे सर्वांचे लक्ष आहे.
( हेही वाचा : वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश घोटाळा, कनेक्शन पश्चिम बंगालपर्यंत)
कोरोना महामारीच्या काळात महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून मोठा घोटाळा केला असून यामध्ये मालाड येथील जंबो कोविड सेंटर तसेच भायखळा रिचडसन क्रुडास येथील घोटाळ्याचे प्रकरण मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी समारे आणले. या कोविड सेंटरमधील घोटाळा तत्कालिन महापालिका सहायक आयुक्त माध्यमातून झाल्याचा आरोप करत संदीप देशपांडे यांनी या घोटाळ्याची चौकशी कॅगमार्फत करण्याची महापालिका आयुक्तांकडे केली होती. या मागणीची दखल घेत महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांना चौकशी करण्याचे निर्देश देत तीन आठवड्यांमध्ये याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार अश्विनी भिडे यांनी आपला चौकशी अहवाल मागील आठवडयात महापालिका आयुक्त तथा प्रशासकांना सादर केल्याची माहिती समोर येत आहे. या अहवालात काय निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे याबाबतची माहिती गुलदत्यात असली तरी यावर महापालिका आयुक्त व प्रशासक काय शेरा मारुन पुढील निर्देश देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अश्विनी भिडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीचे काम सुरु असतानाच मनसेचे संदीप देशपांडे यांनी अधिकाऱ्यासह संबंधित संस्थेच्या प्रतिनिधींच्या व्हॉट्स चॅटची शाहनिशा करण्यासाठी मोबाईल फोन जप्त करणे आवश्यक असून हे काम महापालिकेच्या यंत्रणेला करता येणार नसून त्यासाठी ही चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून केली जावी अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली होती. यावेळी आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन संदीप देशपांडे यांना दिले होते. त्यामुळे मागील आठवड्यातील मंगळवारी हा अहवाला प्राप्त होईल,असे म्हटले होते, त्यामुळे संदीप देशपांडे यांनी शुक्रवारपर्यंतची मुदतवाढ दिली होती.
परंतु नेमक्या त्याच शुक्रवारच्या दिवशी संदीप देशपांडे यांच्यावर काही हल्लेखारांनी भ्याड हल्ला केला आणि त्यात ते जायबंदी झाले. परंतु त्यानंतर या कोविड सेंटरमधील चौकशी समितीचा अहवाल आयुक्तांना सादर केल्यानंतरही त्यांनी अद्यापही याबाबत कोणत्याही प्रकारचा निष्कर्ष नोंदवला नाही किंवा कोणताही निर्णय जाहीर केला नाही किंबहुना कोणत्याही प्रकारची क्लीनचिट किंवा दोषीही ठरवले नाही. त्यामुळे या प्रकरणाबाबत अहवाल प्राप्त होऊन आयुक्तांचे मौन का असाही सवाल आता उपस्थित होत आहे.
याबाबतचा आश्विनी भिडे यांचा चौकशीचा अहवाल दोन ते तीन दिवसांमध्ये मिळणे अपेक्षित आहे,त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन चहल यांनी दिल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मंगळवार नंतर ही कार्यवाही होणे अपेक्षित आहे. शुक्रवारपर्यंत आम्ही प्रशासनाची वाट पाहू आणि त्यानंतर मनसे स्टाईलने याचे उत्तर देऊ असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.
याबरोबरच केईएम रुग्णालयातील रुग्ण सहाय्यता निधीमध्ये विविध माध्यमातून मोठ्याप्रमाणात घोटाळा झाला. केईएम रुग्णालयातील रेडीओलॉजी विभागाच्या गरीब रुग्णांसाठी ठेवलेल्या धर्मादाय निधीच्या बॉक्समध्ये अनियमिता आढळून आल्यानंतर संशयितांच्या विरोधात भेाईवाडा पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. परंतु या ही चौकशी योग्यरितीने व्हायला अशाप्रकारच्या मागणीसाठीही आपण आयुक्तांची भेट घेत या प्रकरणाची चौकशी पोलिसांमार्फत न करता आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे याची चौकशी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत केली जाईल असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचेही देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.