आयआयटी मुंबईला कोरोनाचा विळखा! कॅम्पसमधील रुग्णालय भरले!

लॉकडाऊनच्या काळातही आयआयटी सुरु राहणार आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना घरी जायचे असेल, त्यांनी त्याप्रमाणे कळवल्यास त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात येईल, असे आयआयटी प्रशासनाने म्हटले आहे.

80

राज्यात सर्वत्र कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढत असताना त्यातून मुंबई आयआयटीचे कॅम्पसही सुटलेले नाही. या ठिकाणी तब्बल ७५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. मागील २ आठवड्यांपासून येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडू लागले आहेत. या आठवड्यात २५ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

कॅम्पसच्या बाहेर जाण्यास प्रतिबंध!

वाढत्या कोरोना संसर्गामुळे आयआयटी कॅम्पस प्रशासनाने कॅम्पसमध्ये राहणाऱ्यांना कोरोनासंबंधीच्या सर्व नियमांचे कठोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. कॅम्पसमध्ये वावरताना मास्क लावणे, तसेच कॅम्पस परिसरात अनावश्यक फिरण्यास आणि कॅम्पसच्या बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

कॅम्पस बाहेरील रुग्णालयात काही कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना हलवले!

मागील आठवड्यातच कॅम्पसमधील रुग्णालय कोरोनाबाधित रुग्णांनी भरले होते. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना वसतिगृहातील खोल्यांमध्ये गृह विलगीकरणात ठेवल्याने रुग्णालयात खाटा रिकाम्या झाल्या आहेत. सध्या १७ रुग्ण कॅम्पसच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर ४ जणांना कॅम्पस बाहेरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान बाहेर रुग्णालयात दाखल केलेल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय खर्चाबाबत आयआयटीचे धोरण निश्चित नाही, परंतु आयआयटीच्या कायम कर्मचाऱ्यांचा खर्च मात्र आयआयटी करणार आहे, असे आयआयटीचे जनसंपर्क अधिकारी फाल्गुनी नाहा यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ शी बोलताना सांगितले.

(हेही वाचा : CBSE बोर्डाची १०ची परीक्षा रद्द! )

कॅम्पसमध्ये बाहेरून येणाऱ्यांकडून संसर्ग!

कॅम्पसच्या बाहेरून प्रवास करून येणाऱ्यांकडून कोरोनाची लागण आयआयटी कॅम्पसमध्ये झाल्याचे आयआयटी प्रशासनाने म्हटले आहे. लॉकडाऊनच्या काळातही आयआयटी सुरु राहणार आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना घरी जायचे असेल त्यांनी त्याप्रमाणे कळवल्यास त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात येईल.

कॅम्पसमध्ये ५ हजार जण रहातात!

सध्या कॅम्पसमध्ये आयआयटी स्टाफ, प्रोजेक्ट स्टाफ आणि फॅकल्टी मेंबर आणि त्यांचे कुटुंबीय मिळून २ हजार जण तसेच ३ हजार विद्यार्थी या कॅम्पसमध्ये राहतात. या सर्वांना बाहेरून अन्न पदार्थ घेऊन येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. वसतिगृहातील मेस मात्र सुरु ठेवण्यात येणार आहे. वसतिगृहात विद्यार्थ्यांना त्यांच्या रूम बदलण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.