मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे सरसकट केलेल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर आणि रॅपिट टेस्टबाबत डॉक्टर आणि महापालिका प्रशासन यांच्यात मतभिन्नता निर्माण होताना पहायला मिळत आहे. वाढत्या कोविड चाचण्यांमुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचा निष्कर्ष असला तरी सध्याच्या घडीला ज्या रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत आहेत, अशाच बाधित रुग्णांची चाचणी केली जावी, अशी मागणी महापालिकेच्या विविध रुग्णालय आणि कोविड सेंटरसह आरोग्य विभागातील डॉक्टर करत आहेत.
लक्षणे नसलेल्यांचीही चाचणी केली, तरीही पॉझिटिव्ह येणार
मुंबईत कोविड-ओमायक्रॉन रुग्णवाढीचा आकडा झपाट्याने वाढू लागला असून दरदिवशी आढळून येणाऱ्या रुग्णांपैकी केवळ दहा ते अकरा टक्केच रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागते. किंबहुना त्यांना लक्षणे असतात. परंतु उर्वरीतांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसतात. त्यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ८९ ते ९० टक्के असतानाही कोविडबाबतची भीती मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे. मात्र याबाबत केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण कमी करावे किंवा लक्षणे असलेल्यांचीच कोविड चाचणी केली जावी, असा सूर आता डॉक्टरांमधून उमटू लागला आहे. महापालिकेचे कोविड सेंटर, जंबो कोविड सेंटर आणि रुग्णालयातील डॉक्टर तसेच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लक्षणे नसलेल्यांचीही सध्या कोविड चाचणी केली जात असल्याने रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात फुगलेला पहायला मिळत आहे. त्यांच्या मते लक्षणे असलेल्या रुग्णाच्या शरीरात तो पसरला आहे आणि ज्यांमध्ये ही लक्षणे नाहीत, त्यांना त्याचा संसर्ग झालेला आहे. परंतु सध्या लक्षणे असलेल्या व नसलेल्या दोघांचीही चाचणी केली जात असल्याने ही संख्या वाढत आहे. आज लक्षणे नसलेल्यांचीही चाचणी केली, तरीही ते पॉझिटिव्हच आढळून येणार आहे. परंतु लक्षणे नसलेले तीन दिवसांमध्येच बरे होत आहेत. त्यामुळे ते घरी राहूनही किंवा सीसीटूमध्ये राहून बरे होऊ शकतात. अशा स्थितीत चाचण्यांचे प्रमाण मर्यादीत करून लक्षणे असलेल्यांची केल्यास आणि साथीच्या तापाप्रमाणे याकडे पाहिल्यास हा आजार मोठ्या प्रमाणात नियंत्रणात येणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
(हेही वाचा ऐतिहासिक निर्णय! आईच्या जातीवर मिळाले जात प्रमाणपत्र)
…म्हणून चाचण्या सुरू आहेत
महापालिकेच्या सेव्हनहिल्ससह जंबो कोविड सेंटर आणि इतर रुग्णालयांमध्ये दैनंदिन आढळून येणाऱ्या रुग्णांपैकी केवळ ९ ते १० टक्के रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करून घेतले जाते. परंतु यामध्ये लक्षणे नसलेले रुग्णही घाबरुन किंवा घरातील वयोवृध्दांना याची बाधा होऊ नये म्हणून दाखल होत आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी लक्षणे नसलेल्यांना जर बाजुला केल्यास हे प्रमाण कमी असल्याचेही म्हणणे डॉक्टरांचे आहे. त्यामुळे महापालिकेला खासगी रुग्णालयांना रुग्ण दाखल करताना महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक केल्याचेही आठवण डॉक्टरांनी करून दिली आहे. याबाबत प्रशासनासह झालेल्या बैठकीत डॉक्टरांनी बऱ्याच वेळा ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, चाचण्या कमी करण्याबाबत केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचे निर्देश येत नाही, तोवर या चाचण्या कमी केल्या जावू नये अशीच भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
डॉक्टरांचे काय म्हणणे आहे?
मात्र, दक्षिण आफ्रिका, युके आदींमध्ये या चाचण्या कमी करण्यात आल्याने केंद्राने चाचण्यांबाबतची नवीन नियमावली तयार केल्यास त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल, परंतु टास्क फोर्स आदी जो निर्णय घेईल, त्यानुसारच अंमलबजावणी केली जाईल, असे प्रशासनांकडून सांगण्यात येत असल्याने डॉक्टर मंडळी हतबल ठरताना दिसत आहे. त्यामुळे दरदिवशी वाढत्या रुग्ण संख्येच्या आकड्यांमुळे निर्माण होणारी भीषणता आणि भीती ही केवळ आणि केवळ चाचण्यांची संख्या कमी केल्यासच होऊ शकते. दोन लस घेतलेल्या आणि लक्षणे नसलेल्यांना कोणत्याही प्रकारचा धोका नसतानाही चाचण्यांवर केला जाणारा खर्च सध्या डॉक्टरांच्या जिव्हारी लागत आहे. त्यापेक्षा हाच खर्च ह्दयविकार, कर्करोग, क्षयरोग आदी रुग्णांवर केल्यास योग्य ठरेल, अशा प्रकारचे मतही डॉक्टर व्यक्त करताना दिसत आहे.
Join Our WhatsApp Community