कोविड-१९ संसर्गाचे रुग्ण इतर देशांमध्ये वाढले असल्याच्या पार्श्वभूमीवर, खबरदारी म्हणून कोविड उपाययोजना पूर्वतयारीची खातरजमा करण्याचे निर्देश केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका संचालित अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात कोविड उपचार व्यवस्था यंत्रणा सुसज्जता आणि इतर उपाययोजनांची रंगीत तालीम मंगळवारी २७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी घेण्यात आली.
( हेही वाचा : बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार शिवाजी मंदिरमध्ये!)
वैद्यकीय प्राणवायू (ऑक्सिजन) ची उपलब्धता व क्षमता तसेच प्राणवायू वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची तपासणी, सर्व प्रकारच्या अतिदक्षता विभागांमधील उपकरणे सुव्यवस्थितपणे कार्यरत आहेत याची खातरजमा, कोविड रुग्ण दाखल करुन घेताना पाळावयाची आदर्श कार्यपद्धती, कोविड बाधितांवर उपचार करताना वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी यांनी पाळावयाच्या आदर्श नियमावलीचे प्रशिक्षण, तसेच अचानक रुग्ण संख्या वाढल्यास अतिदक्षता उपचारांची आवश्यकता असणारे रुग्ण व अन्य कोविड बाधित यांच्यावर एकाचवेळी उपचार करताना पाळावयाच्या वैद्यकीय पद्धती या सर्व मुद्यांवर प्रात्यक्षिके आणि रंगीत तालीम मंगळवारी घेण्यात आली. कोविड उपचारांसाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती सुव्यवस्थितपणे कार्यरत आहे, याची खातरजमा करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार ही प्रात्यक्षिके व रंगीत तालीम करण्यात आली, अशी माहिती रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. महारुद्र कुंभार यांनी दिली.
Join Our WhatsApp Community