मुंबईत शनिवारी, 10 एप्रिल रोजी दिवसभरात ९,३२७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून दिवसभरात सर्वाधिक ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये सप्टेंबर महिन्यात दैनंदिन रुग्णांची संख्या ५०च्या घरात होती. परंतु पुन्हा एकदा मृत्यूचा आकडा वाढत असून तो सप्टेंबर महिन्याप्रमाणे ५० पर्यंत पोहोचल्यामुळे मुंबईकरांना आता विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
५० रुग्णांचा मृत्यू झाला!
मुंबईमध्ये शुक्रवारी ९,२०० रुग्ण आढळून आले होते, त्यानंतर शनिवारी ९,३२७ रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ८,४७४ रुग्ण बरे होवून घरी परतले. तर शनिवारपर्यंत एकूण ९१ हजार १०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर दिवसभरात एकूण ५० रुग्णांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी ३५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एकाच दिवसांमध्ये रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढतीच असल्याचे दिसून येते. ज्या ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यातील २८ रुगण हे दिर्घकालिन आजारी होते. त्यात ६० वर्षांवरील मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या २३ एवढी आहे. तर ४० ते ६० वयोगटातील मृतांचा आकडा ११ एवढा आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर ८२ टक्क्यांवरुन ७९ टक्क्यांवर
रुग्ण बरे होण्याचा दर आता ८२ टक्क्यांवरुन घसरुन आता ७९ टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुपटीचा दर हा ३४ दिवसांवर आला आहे. तर शनिवारपर्यंत ७६ झोपडपट्टी व चाळी या कंटेन्मेंट झोनमध्ये नोंद झाल्या आहेत. आणि ७७७ इमारती या सील करण्यात आल्या आहेत. तसेच चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत असून दिवसभरात ५५ हजार ७४१ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा : पी- उत्तर विभागाला सहायक आयुक्त मिळेना! सर्वाधिक लोकसंख्या असलेला विभाग वाऱ्यावर!)
दादर व माहिमची शंभरी कायम, धारावी पुन्हा निम्म्यावर
दादर, माहिम व धारावी या महापालिकेच्या जी उत्तर विभागातील शनिवारी दिवसभरात २९१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये दादरमध्ये ११९ आणि माहिममध्ये ११६ रुग्ण आढळले. तर धारावीमधील रुग्णांची संख्या ५६ एवढी आहे. त्यामुळे यासर्व विभागात शनिवारपर्यंत एकूण ४,४८५ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये माहिममधील सर्वाधिक १,८३२ रुग्ण तर दादरमधील १,६७१ रुग्णांचा समावेश आहे. तर धारावीमध्ये ९८२ रुग्ण उपचार घेत आहे.
माहिममधील अल्ट्रा सोसायटीत २६ कोरोनाबाधित रुग्ण
माहिम येथील दिलीप गुप्ते मार्गावरील अल्ट्रा सोसायटी शनिवारी महापालिकेच्या जी उत्तर विभागाने मिनी कंटेन्मेंट म्हणून जाहीर केले आहे. शनिवारी आणि यापूर्वी आढळून आलेले अशाप्रकारे मागील चार दिवसांमध्ये एकूण २६ रुग्ण आहेत. दिवसभरात इमारतीमध्ये १० आणि अल्ट्रावाडी तथा चाळीत ४ अशाप्रकारे १४ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, कोरोनाच्याा संसर्गानंतर आतापर्यंत या सोसायटीतील बाधित रुग्णांपैकी ९६ रुग्ण बरेही झाले असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
Join Our WhatsApp Community