बापरे! कोरोना रुग्ण वाढले, खाटा भरल्या! 

१ एप्रिल रोजीच सर्व खासगी रुग्णालयांमधील खाटा खचाखच भरल्या गेल्या आहेत. साडेआठ हजार रुग्ण होत असताना महापालिकेच्या कोविड रुग्णालयांसह कोविड काळजी केंद्रांमध्येही उपलब्ध खाटांची क्षमता संपत आली आहे.

128

मुंबईत येत्या काही दिवसांमध्ये कोविड रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची भीती टास्क फोर्सच्या माध्यमातून वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे १० हजारांपर्यंत रुग्ण वाढले तरी रुग्णांना उपचार करण्यासाठीच्या खाटांची क्षमता मुंबई महापालिकेकडे असल्याचा दावा आयुक्तांकडून केला जात आहे. परंतु १ एप्रिल रोजीच सर्व खासगी रुग्णालयांमध्ये खाटा खचाखच भरल्या गेल्या. साडेआठ हजार रुग्ण होत असताना महापालिकेच्या कोविड रुग्णालयांसह कोविड काळजी केंद्रांमध्येही उपलब्ध खाटांची क्षमता संपत आली आहे. मग दहा हजारांवर रुग्ण वाढल्यास खाटांची क्षमता कधी आणि कशाप्रकारे वाढणार असा सवाल केला जात असून खाटांअभावी लोकांना तडफडण्याची वेळ एप्रिल, मे महिन्यामध्ये येईल, अशी भीती वर्तवली जात आहे.

रुग्णशय्यांची क्षमताही संपू लागली!

मुंबईमध्ये बुधवारी ५,३९४ रुग्ण आढळून आले, तर गुरुवारी हा आकडा ८,६४६ वर जावून पोहोचला. त्यामुळे पाच हजारांवर रुग्ण संख्या पोहोचूनही महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादले जात  नसून प्रथमच आयुक्त आता सरकारवर निर्भर राहिले आहेत. सरकारच्यावतीने जारी होणाऱ्या निर्देशांचे पालन करण्यावर मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी भर दिला आहे. त्यामुळे दहा हजारांवर रुग्ण संख्या जाण्याची शक्यता वर्तवणाऱ्या आयुक्तांकडून एवढी रुग्ण संख्या झाली, तरी त्यासाठी महापालिका समर्थ असल्याचे जणू सांगत आहे. परंतु साडेआठ हजारांवर रुग्ण संख्या येत्या एक ते दोन दिवसांमध्ये दहा हजारी पार करेल. साडेपाच हजार रुग्ण संख्या असतानाच महापालिका व खासगी कोविड रुग्णालयांमध्ये व केंद्रांमध्ये केवळ ३,३२० बेड शिल्लक होते. त्यानंतर हा आकडा साडेआठ हजारांवर पोहोचल्यानंतर रुग्णशय्यांची क्षमताही संपू लागली आहे.

(हेही वाचा : ५० टक्के उपस्थितीसह वर्क फ्रॉम होम : खासगी कार्यालये विसरले नियम!)

महापालिकेकडे २,९८८ एवढ्या खाटा रिकाम्या!

मुंबई महापालिकेच्या कोविड रुग्णालयांसह कोविड काळजी केंद्रांमध्ये ९२६ आयसीयू खाटा आणि ९,४९० सामान्य खाटा याप्रमाणे १० हजार ४१६ खाटांची क्षमता आहे. त्यातील आयसीयूमधील ७९२ आणि सामान्य ६,६३६ खाटा याप्रमाणे ७,४२८ खाटा भरलेल्या असून एकूण २,९८८ खाटा गुरुवारी सकाळपर्यंत रिकाम्या होत्या. त्यामध्ये १३४ आयसीयू खाटा आणि २,८५४ सामान्य खाटांचा समावेश आहे. याशिवाय ६,१९९ ऑक्सिजन खाटांपैकी ४,५१३ खाटा भरल्या आहेत. त्यामुळे १,६८६ खाटा या रिकाम्या होत्या. याशिवाय महापालिकेच्या कोविड रुग्णालयांसह कोविड सेंटरमध्ये ६५१ व्हेंटीलेटरपैकी ५७१ व्हेंटीलेटर वापरात असून ८० व्हेंटीलेटर हे गुरुवारी सकाळपर्यंत रिकामे होते. त्यामुळे या सर्व रुग्णालय व कोविड सेंटरमध्ये आयसीयू बेड १३४ आणि सामान्य खाटा या  २,८५४ अशाप्रकारे २,९८८ एवढ्या जागा रिकाम्या आहेत.

खासगी रुग्णालयांमध्ये २,९८८ एवढ्या खाटा रिकाम्या!

महापालिकेसह खासगी रुग्णालयांमध्ये ६६९ आयसीयू आणि २,८५१ सामान्य बेड अशाप्रकारे ३,५२० खाटांची क्षमता आहे. त्यातील २,९२५ खाटा भरलेल्या असून केवळ ५९५ खाटा रिकाम्या आहे. यामध्ये १२९ आयसीयू आणि ४६६ खाटा या सामान्य बेडच्या आहेत. गुरुवार सकाळपर्यंत महापालिकेसह शासकीय आणि खासगी कोविड रुग्णालयांमधी सीसी टू, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर,  डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आदींमध्ये ७३ टक्के खाटा या भरलेल्या असून २७ टक्के खाटा या रिकाम्या आहेत.

(हेही वाचा : राज्यात लसीकरणाचा चौथा टप्पा! लसीकरण केंद्रातील गोंधळाचे काय? )

सीसीसी टू (संपर्कात आलेले परंतु लक्षणे नसलेले.)

एकूण क्षमता      :   ४,१०१

भरलेल्या खाटा  :  २,८०२

रिकाम्या खाटा    :  १,२९९

डिसीएचसी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर

एकूण क्षमता      :  ६,२६४

भरलेल्या खाटा   :  ४,३९०

रिकाम्या खाटा    :  १,८७४

डेडिकेटेड कोविड रुग्णालय

एकूण क्षमता      :  ७,६७२

भरलेल्या खाटा  :  ५,९६३

रिकाम्या खाटा    :  १,७०९

खासगी रुग्णालये

एकूण क्षमता      :  ३,५२०

भरलेल्या खाटा   :  २,९२५

रिकाम्या खाटा    :  ५९५

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.