सोशल मिडीयाच्या काळात आता अनेक वस्तुंचे मार्केटिंग स्मार्ट पद्धतीने होऊ लागले आहे. अगदी गायीच्या शेणापासून बनलेल्या गोवऱ्यादेखील वॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून विकल्या जात आहेत. विशेष म्हणजे होळीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरात ग्राहक सोशल मिडीवर गोवऱ्यांची ऑर्डर बुक करताना दिसून येत असून गोशाळा ग्राहकांना घरपोच डिलीवरी देखील करीत आहेत.
होलसेल दराने होतेय गोवऱ्यांची विक्री
होळीच्या सणाला प्रत्येक घरासमोर गोवऱ्या, लाकडांची होळी पेटविली जाते. होळीची पूजा करून नेवैद्य दाखविला जातो. या सणासाठी गोवऱ्यांना चांगली मागणी असते. ग्रामीण भागात घरोघरी गोवऱ्या असतात. तथापि, शहरात त्या विकत घ्याव्या लागतात. शहरातील मुख्य बाजारपेठेत गोवऱ्यांचे ढीग दिसून आले. 25 ते 50 रुपयांना 5 गोवऱ्या, असे दर होते. ग्राहकांकडून, गायींच्या शेणापासून बनविलेल्या गोवऱ्या आहेत का, अशी विचारणा झाल्यानंतर, बहुतेक विक्रेत्यांनी तसे मार्केटिंग करीत विक्री केली. गोशाळा सरसावल्या गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील गोशाळांनी गायीच्या शेणापासून गोवऱ्या बनवून होलसेल दराने विक्री करण्यात आली.
वणवण केल्यावर शेतकऱ्यांना गोणीभर गोव-या
तर दिवसभर रानावनात वणवण केल्यावर एखादी गोणी गोवऱ्या मिळतात. त्या वर्षभर जपत होळीला विक्री करून त्यातून पोटाची खळगी भरतो. मात्र, आता ग्रामीण भागातील पशुधन घटल्याने जगणे अवघड बनले आहे, अशी खंत नाशिकच्या गंगाघाटावर मोठ्या संख्येने दाखल झालेल्या गोवऱ्या विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
(हेही वाचा – यंदाच्या होळीला पर्यटनाचा रंग!)
पशुधन निम्म्यापेक्षा अधिक घटल्याने गोवऱ्या दुरापास्त
आज होळी असून त्यासाठी त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर गोवऱ्या विक्रेते दाखल झाले आहेत. अद्यापही ग्राहक फिरकत नसल्याचे दिसून आले. यावेळी या विक्रेत्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी पूर्वीपेक्षा पशुधन निम्म्यापेक्षा अधिक संख्येने घटल्याने शेणासह रानशेणी गोवऱ्या मिळणे दुरापास्त झाल्याचे सांगितले. सध्या तीन ते चार रुपयाला थापलेल्या गोवऱ्या उपलब्ध आहेत, तर पोतभर रानशेणी गोवऱ्या दीडशे ते दोनशे रूपयांत उपलब्ध होत आहेत. वर्षभर गोळा केलेल्या गोवऱ्यांना योग्य मोल मिळावे, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त करत काही ग्राहक अतिशय कमी किमतीत गोवऱ्या मागतात, अशी खंतही काही महिलांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community