Crawford Market : क्रॉफर्ड मार्केटमधील मासळी बाजारात शितगृहाची व्यवस्था, जूनपर्यंत होणार सर्वांसाठी खुले?

पुनर्विकासानंतर विक्रेते, नागरिक यांच्यासाठी वाढीव सेवा-सुविधा उपलब्ध होणार असून पर्यटकांच्या पसंतीस देखील या सुविधा उतरतील, असा महानगरपालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.

2104
Crawford Market : क्रॉफर्ड मार्केटमधील मासळी बाजारात शितगृहाची व्यवस्था, जूनपर्यंत होणार सर्वांसाठी खुले?

डॉ. दादाभाई नौरोजी मार्गावरील महात्मा जोतिबा फुले मंडई अर्थात क्रॉफर्ड मार्केटचा मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्विकास करण्यात येत आहे. या क्रॉफर्ड मार्केटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मासळी विक्रेत्यांना स्थलांतरीत करण्यात येणार असून क्रॉफर्ड मार्केटमधील या मासळी बाजाराचे काम तब्बल ८० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या जून अखेरपर्यंत येथील मासळीबाजार खुला केला जाणार आहे. या मासळी बाजारात विक्रेत्यांसाठी शितगृहाचीही व्यवस्था करण्यात आली असून मासळी विक्रेत्यांना थर्माकोलचे किंवा शितपेट्यांसह बर्फाची व्यवस्था करावी लागणार नाही. मात्र, ही व्यवस्था मासळी विक्रेत्यांच्या असोशिएशनसोबत चर्चा करूनच पुरवली जाणार असून जर त्यांची तयारी नसेल तर ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार नसल्याचेही महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Crawford Market)

क्रॉफर्ड मार्केटचा चार भागात पुनर्विकास

महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांनी महात्मा जोतिबा फुले मंडई अर्थात क्रॉफर्ड मार्केटचा पुनर्विकास कामांचा शनिवारी २० एप्रिल रोजी स्थळ भेटीतून आढावा घेतला. महात्मा जोतिबा फुले मंडईचा (पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट) चार भागात पुनर्विकास करण्यात येत आहे. त्यातील भाग तीन व चारचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यादृष्टीने प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आयुक्त गगराणी यांनी शनिवारी भेट दिली. मंडईतील तळघरातील सुविधा, वाहनतळ, गाळे, विद्युतीकरण कामे, उद्वाहन व्यवस्था आदींची त्यांनी पाहणी केली. इमारतीमध्ये सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी सुयोग्य व्यवस्था करण्यात आली आहे. (Crawford Market)

(हेही वाचा – BMC : मुंबईतील जाहिरात कंपन्यांकडून झाडांची कत्तल? ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वृत्ताची दखल; सोमय्यांची मनपाला पत्र लिहून चौकशीची मागणी)

मासळी विक्रेत्यांसाठी शितगृहाचीदेखील तजवीज

या क्रॉफर्ड मार्केटच्या ठिकाणी मासळी विक्रेत्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या नवीन अद्ययावत इमारतीचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. मासळी विक्रेत्यांसाठी शितगृहाचीदेखील तजवीज करण्यात आली आहे. या सर्व कामांचा आयुक्त गगराणी यांनी तपशिल जाणून घेतला. भाग तीन व चार मधील मंडईच्या पुनर्विकासासह रंगरंगोटीची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मासळी विक्रेत्यांसाठीच्या इमारतीची उर्वरित कामे देखील लवकर पूर्ण करावीत, असेही निर्देश त्यांनी याप्रसंगी दिले. (Crawford Market)

पुरातन वारसा असलेल्या महात्मा जोतिबा फुले मंडईचा पुनर्विकास करताना आतील भागात एक एकर क्षेत्रफळामध्ये लॅण्डस्केपिंग देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे मंडईचे देखणेपण वाढणार आहे. मुंबईत येणारे परदेशी पाहुणे हमखास या मंडईला भेट देतात. पुनर्विकासानंतर विक्रेते, नागरिक यांच्यासाठी वाढीव सेवा-सुविधा उपलब्ध होणार असून पर्यटकांच्या पसंतीस देखील या सुविधा उतरतील, असा महानगरपालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. यावेळी याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (सुधार) संजोग कबरे, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) संजय कौडण्यपुरे, ए विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे, सहायक आयुक्त (बाजार) प्रकाश रसाळ, पुरातन वास्तूविशारद व सल्लागार आभा लांबा आदी या भेटीप्रसंगी उपस्थित होते. (Crawford Market)

महापालिका आयुक्तांनी पाहिली राणीबाग

महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय आवारातील भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाला भेट दिली. या वस्तुसंग्रहालयाच्या पुरातन इमारतीची देखभाल व दुरुस्ती, संरक्षणाच्या दृष्टीने जीर्णोद्धाराची कामे सुरु आहेत. या भेटीच्या निमित्ताने आयुक्त गगराणी यांनी प्राणिसंग्रहालयातील क्रॉक ट्रेल (मगर आणि सुसरसाठीचे मोठे तळे), पेंग्विन कक्ष तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाला भेट दिली. नाट्यगृहात अधिकाधिक सुविधा कशा उपलब्ध करून देण्यात येतील याबाबत आयुक्त गगराणी यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) संजय कौडण्यपुरे, प्रमुख अभियंता (इमारत परिरक्षण) यतीन दळवी, संचालक (प्राणिसंग्रहालय) संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, जमनालाल बजाज फाउंडेशनच्या तसनीम मेहता आदी उपस्थित होते. (Crawford Market)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.