देशात शुक्रवार, ८ मे रोजी, सलग चौथ्या दिवशी कोरोनाची रुग्ण संख्या ४ लाखावर आहे. यामध्ये जरी महाराष्ट्राचा आकडा कमी होत असला तरी तो आकडा मुंबई आणि महामुंबई परिसरातील आहे, मात्र ग्रामीण भागातील रुग्ण संख्या वाढतच आहे. तसेच मृत्य संख्याही वाढत आहे. त्यामुळे आजही ग्रामीण भागातील स्मशानभूमीत मृतदेहांचा रांगा लावल्या जात आहेत. म्हणून नाशिक महापालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणती स्मशानभूमी कधी रिकामी आहे, याची माहिती ऑनलाईन पोर्टलद्वारे देण्यात सुरुवात केली आहे.
अंत्यसंस्काराचेही नियोजन करण्याचे उच्च न्यायालयाचे होते निर्देश!
राज्यात ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. सरकार त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र यावर अजूनही नियंत्रण मिळवणे शक्य होत नाही. तसेच दुसरीकडे मृत्यूही वाढत आहेत. त्यामुळे स्मशानभूमींवर ताण पडत आहे. ग्रामीण भागात विद्युत दाहिनी नाहीत. त्या ठिकाणी मृतदेह जाळावे लागत आहेत. त्यामुळे तिथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास वेळ लागत आहे. परिणामी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी तासनतास प्रतीक्षेत असतात. म्हणून मुंबई उच्च न्यायालयानेही याची दखल घेत स्मशानभूमीचेही नियोजन करावे, असे निर्देश सरकारला दिले होते.
(हेही वाचा : आता 8 लाख प्रशिक्षित आयुष डॉक्टर कोविड सेवेसाठी उपलब्ध होणार)
मृतांच्या नातलगांना होणार फायदा!
त्याप्रमाणे नाशिक महापालिकेने यात पुढाकार घेतला आहे. महापालिकेने पोर्टल लाँच केले आहे. त्यामध्ये आता मृतांच्या नातलगांना त्यांच्या राहत्या घराजवळ कुठे स्मशानभूमी रिकामी आहे का, याची माहिती या पोर्टलवर मिळणार आहे. त्याप्रमाणे स्मशानभूमी या पोर्टलद्वारे बुक करता येणार आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांची धावपळ थांबणार आहे.
Join Our WhatsApp Community