ससून रुग्णालयाच्या परिसरातून ललित पाटील आणि साथीदारांकडून सव्वा दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आल्यानंतर पुणे पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेतीन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी विश्रांतवाडीमधील गोदामात ठेवलेले दीड कोटी रुपयांचे (Crime) मेफेड्रोन पोलिसांनी जप्त केले आहे.
वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (४०, रा. खडीचे मैदान, सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसिया (३५) आणि हैघदर शेख (रा. विश्रांतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अमली पदार्थ विक्रीत आंतरराष्ट्रीय तस्करांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. माने आणि शेख हे सराईत गुन्हेगार आहेत. माने आणि करोसिया हे सोमवार पेठेतील खडीचे मैदान परिसरात थांबले असून ते अमली पदार्थांची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलिस शिपाई विठ्ठल साळुंके यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा लावून माने आणि करोसिया यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक कोटी रुपयांचे ५०० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. शेखने मिठाच्या गोदामात एका पोत्यात मेफेड्रोन लपवून ठेवले होते. त्या गोदामातून दीड कोटी रुपयांचे ७५० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. गोदामात मिठाची आणखी पोती आहेत. त्या पोत्यांमध्ये मेफेड्रोन ठेवल्याची शक्यता असून, पोत्यांची तपासणी करण्यात येत आहे.
(हेही वाचा – Sunil Tatkare : शिवरायांची स्वराज्य प्रेरणा डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीची वाटचाल – तटकरे )
पोलिसांनी दोघांची चौकशी केली. तेव्हा विश्रांतवाडीतील हैदर शेखने त्यांना मेफेड्रोन विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके पाठविण्यात आली. शेखला पोलिसांनी ताब्यात घेतले.
अमली पदार्थ तस्करांवर कडक कारवाई करण्यात येणार असून, त्यांच्या मागावर गुन्हे शाखेची पथके असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे, सतीश गोवेकर यावेळी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community