आरे येथील मेट्रो तीनच्या कारशेडसाठी गेल्या वर्षी रात्रीच्या काळोखात मेट्रो प्रशासनाने झाडे तोडण्यास सुरवात केली .या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी आरेमध्ये धाव घेतली. पर्यावरण प्रेमी, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांच्या शेकडो प्रतिनिधींनी आरेमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी या पर्यावरण प्रेमींना अडवले. या आंदोलनात सहभागी झालेले पर्यावरण प्रेमी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले होते. या आदोलनांमध्ये विद्यार्थी व गृहिणींचा समावेश होता. गुन्हे दाखल असल्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी व पासपोर्ट मिळवण्यात तर काहींना घरे मिळवण्यात अनेक अडचणी येत होत्या. कारण पोलिस तपासणीत या आदोलंकाच्या विरोधात आरेच्या आंदोलनात भाग घेतल्याचा गुन्हा दाखल होता. त्यामुळे या पर्यावरणप्रेमींच्या विरोधातील गुन्हे मागे घेण्याची सतत मागणी होत होती.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर झाले आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर आरेच्या आंदोलनामधील आंदोलनावरील गुन्हे मागे घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या होत्या. आरेमध्ये वृक्ष तोडीच्या विरोधात आंदोलन केलेल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी विनंती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आजच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रीमंडळातील इतर सदस्यांनीही आदित्य ठाकरे यांच्या मागणीला पाठिंबा दिला. यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आरेच्या आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे त्वरीत मागे घेण्याची कार्यवाही करावी, असे आदेश गृह विभागाला दिले आहेत.