महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील तलावात मगरीचे दर्शन…

धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील खाडी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून मगरीचे दर्शन होत होते. गेल्या तीन दिवसांपासून मगर आता उद्यानातील तलावात आल्याचे काही प्रत्यक्षदर्शी निसर्गप्रेमींनी पाहिल्यानंतर प्रशासनाला कळवले. मगरीला पकडण्याबाबत वनविभागाला कळवल्याची माहिती उद्यान प्रशासनाने दिली.

डम्पिंग ग्राउण्डवर उभारलेल्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानामागील मिठी नदी परिसरात मगर दिसत होती. मगर दरम्यानच्या काळात दिसत नसल्याने, समुद्रात निघून गेल्याचा अंदाज उद्यानातील अधिका-यांनी बांधला. शुक्रवारी उद्यानातील पर्जन्य मापक प्रकल्पातील तलावात मगर दिसू लागली. हा परिसर कार्यालयाजवळच आहे. उद्यानात हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पक्षी भेट देतात. अनेक शाळकरी विद्यार्थीही सहलीसाठी उद्यानाला भेट देतात. कोरोनानंतर उद्यानातील पर्यटकांची संख्या रोडावली आहे. मगरीबाबत माहिती मिळताच लहान वयोगटातील पर्यटकांची संख्या कमी होण्याची भीती उद्यान प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

( हेही वाचा: नवीन वर्षात आरोग्य व्यवस्थेला अजून बळकटी देण्याची गरज )

मगर आली कुठून?

 तलाव खोल असल्याने माशांची संख्या मुबलक प्रमाणात आहे. माशांसाठी खाडीशी संलग्न पाईपलाईनमधून मगरीने तलावात प्रवेश केला असल्याची माहिती वन्यजीव अभ्यासकांनी दिली. तलावाला कुंपण असल्याने मगरीचा धोका नाही, असा दावा वन्यजीव अभ्यासकांचा आहे. मगर नव्या अधिवासाच्या शोधात आल्याने तिला तलावाबाहेर काढले जाऊ नये, अशी मागणीही वन्यजीव अभ्यासकांकडून केली जात आहे. पवई तलावांतून पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात मोठ्या संख्येने जलपर्णी माहिम, दादर खाडीत वाहून येतात. पाण्याच्या प्रवाह वाढल्यानेच पवई तलावातून ही मगर महाराष्ट्र निसर्ग परिसरातील मिठी नदीतील भागांत आल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here