धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यानानजीकच्या मिठी नदी पात्रात मगरीचा वावर दिसून आला आहे. सोमवारी, 10 आॅक्टोबर रोजी सकाळपासून मिठी नदी पात्रात महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील निसर्ग अभ्यासक सत्यम गुप्ता यांनी मिठी नदीच्या पात्रातील दलदलीच्या भागांत मगरीला पाहिले. ही मगर जर समुद्रात निघून गेली असेल तर ठीक आहे, अन्यथा शहरी भागात आल्यास गोंधळ निर्माण होईल, अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
निसर्ग उद्यानातील अधिका-यांमध्येही भीतीचे वातावरण
वन्यजीव अभ्यासकांच्या मते, पवई तलाव पाण्याचा जोर वाढल्याने ही मगर मिठी नदी पात्रात वाहत आली असावी. याआधीही पवई तलावातील ब-याच जलपर्णी दादर, माहिम येथील समुद्रात वाहत आल्या आहेत. तलाव भरुन पाणी ओसंडून वाहत असल्याने सध्या हा प्रकार होत असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे. मंगळवारी सकाळी महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील अधिका-यांनी सकाळी नदीपात्राची पाहणी केली. त्यावेळी सकाळी मगरीचे दर्शन झाले. भरतीच्यावेळी मगर पुन्हा आतमध्ये पाण्यात गेल्याने मगरीच्या वावराबाबत निसर्ग उद्यानातील अधिका-यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. निसर्ग उद्यानात किंवा थेट नदीपात्रातून मगर वांद्रे-कुर्ला संकुलातही जाऊ शकते. भरतीच्या वेळी पाण्याच्या प्रवाहात मगर नदीच्या खोल पात्रात जात आहे. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून नदीजवळील उद्यानातील कामे थांबवण्यात आली आहे.
(हेही वाचा शिंदेंच्या ‘उठावा’ला मिळाली ‘ढाल-तलवारी’ची साथ)
Join Our WhatsApp Community