अयोध्येचे श्रीरामाचे मंदिर पूर्णत्वास येत आहे, आता मंदिरातील श्रीरामाची मूर्ती घडवण्याची लगबग सुरु झाली आहे. त्यासाठी शालीग्राम शीळा अयोध्येत दाखल झाली आहे. हे मंदिर जानेवारी २०२४ मध्ये बांधून पूर्ण होणार आहे. त्यामुळेच, राम मंदिराच्या कामाला गती आली असून प्रभू श्रीरामांची मूर्ती साकारण्यात येणाऱ्या शालीग्राम शीळाही अयोध्येत दाखल होत आहेत.
संतांनीही पुष्पवृष्टी करत शिळांचे पूजन केले
गोरक्षनाथ मंदिरात रात्रीचा मुक्काम केल्यानंतर सकाळी ८ वाजता संत-महात्म्यांकडून पूजा-आरती झाल्यानंतर शालीग्राम शिळांचे अयोध्येकडे प्रस्थान झाले आहे. तत्पूर्वी नेपाळचे माजी गृहमंत्री आणि उपपंतप्रधान विमलेंद्र निधई यांनी सपत्नीक या शीळांची पूजा केली होती. नेपाळहून गोरखपूरला पोहोचलेल्या शालीग्राम शीळा सकाळी अयोध्येसाठी रवाना झाल्या आहेत. गोरखपूरमध्ये या शिळांचे आगमन होताच, पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे मध्यरात्री ११ वाजण्याच्या सुमारास या शिळा गोरखपूरला पोहोचल्या होत्या. नंदानगर, मोहद्दीपुर, विश्वविद्यालय चौकात या शिळांचे भव्य स्वागत करण्यात आले. गोरक्षनाथ मंदिरात प्रमुख पुजारी कमलनाथ यांच्या नेतृत्त्वात संतांनीही पुष्पवृष्टी करत या शिळांचे पूजन केले. यावेळी, स्थानिक नेत्यांनीही, भाजपच्या मंत्र्यांनीही या शिळांचे पूजन करुन दर्शन घेतले. रात्रीचा मुक्काम गोरक्षनाथ मंदिरात झाल्यानंतर आज सकाळी शिळांचे प्रस्थान झाले. दरम्यान, सकाळच्या पूजा-आरतीलाही मोठ्या संख्यने भाविक जमा झाले होते. यावेळी, उपस्थित गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली.
(हेही वाचा ‘तेजस’चे उतरले ‘तेज’; पैसे फुल, सुविधा गुल)
Join Our WhatsApp Community