-
ऋजुता लुकतुके
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर भारताने रशियाकडून कमी दरात कच्चं तेल मागवलं होतं. आता भारत असाच करार व्हेनेझुएलासोबत करण्याच्या तयारीत आहे. भारतातील तेल शुद्धीकरण प्रकल्प आता व्हेनेझुएलामधून कच्चं तेल आयात करण्याची शक्यता आहे. तशी बोलणीही सुरू झाली आहेत. अमेरिकेनं या लॅटिन अमेरिकन देशावर घातलेले निर्बंध उठवल्यामुळे भारताला कमी दरात तेल आयात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Crude Oil Import)
यापूर्वी म्हणजे अमेरिकेनं व्हेनेझुएलावर निर्बंध घालण्यापूर्वी २०१९ पर्यंत भारत या देशातून आपल्या गरजेपैकी ६ टक्के तेल आयात करत होता. अर्थात, सध्या व्हेनेझुएला देशातील सरकारी तेल कंपन्या तिथल्या जमिनीतून पूर्ण क्षमतेनं तेल काढू शकणार नाहीएत. काही वर्ष तिथं पूर्ण क्षमतेनं तेल उत्खनन झालेलं नाही. त्यामुळे आताही तेल कंपन्यांची उपकरणं गंजलेली तरी आहेत किंवा ती चालू स्थितीत नाहीत. त्यामुळे सध्याची व्हेनेझुएलाची तेल उत्खनन क्षमता ही ८,००,००० ते ८,५०,००० लाख बॅरल प्रतीदिन इतकीच असल्याचं एस अँड पी ग्लोबल कमोडिटिज या संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. (Crude Oil Import)
(हेही वाचा – Maratha Reservation : राज्याच्या अनेक भागात एसटीच्या फेऱ्या रद्द)
पुढचे सहा महिने ही क्षमता वाढणार नसल्याचा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे भारत आणि व्हेनेझुएलात नेमकी काय बोलणी होतात हे आता पहावं लागेल. पण, व्हेनेझुएला हा भारताचा जुना ट्रेडिंग पार्टनर आहे. २०१९ नंतर अमेरिकेनं देशातील आर्थिक आणि राजकीय अस्थिर परिस्थिती पाहून या देशावर निर्बंध लादले होते. या देशाबरोबर कुणीही व्यापार करू नये असं अमेरिकेचं म्हणणं होतं. पण, मागच्या महिन्यातच व्हेनेझुएलाने आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली सार्वत्रिक निवडणुका घेण्याची तयारी दाखवली आहे आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेनं आपले निर्बंधही उठवले. (Crude Oil Import)
त्यानंतर आता भारताला व्हेनेझुएलातून स्वस्त तेल आयात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २०१७ ते २०१९ या कालावधीत भारत ३,००,००० बॅरल तेल इथून आयात करत होता. आणि देशाच्या एकूण गरजेपैकी ५ ते ७ टक्के तेल तेव्हा आपण व्हेनेझुएलाकडून घेत होतो. २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धानंतर आपण रशियाकडून पहिल्यापेक्षा चौपट तेल आयात करत आहोत. (Crude Oil Import)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community