मुंबई महापालिकेच्यावतीने रुग्णालयांसमवेत आता कोविड सेंटरमध्येही ऑक्सिजन प्लांट उभारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु कोविड सेंटर ही तात्पुरती सेवा असून, रुग्णालये ही कायमस्वरुपी आहेत. पण महापालिकेच्यावतीने सीएसआर निधीचा वापर हा कायमस्वरुपी असलेल्या रुग्णालयांमध्ये केला जात असून, महापालिकेचा स्वतःचा निधी हा बहुतांशी कोविड सेंटरमध्ये खर्च होत आहे. त्यामुळे सीएसआर निधीतून कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याची गरज असताना, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये या निधीचा वापर करत असल्याने एकप्रकारे महापालिकेच्या अजब कारभाराचे दर्शन घडत आहे.
निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात
मुंबई महापालिकेच्यावतीने कोविडच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जात असतानाच, महापालिका रुग्णालये व जंबो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारले जात आहेत. मुंबईतील १२ रुग्णालयांमध्ये १६ ऑक्सिजन प्लांट उभारण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे, तर जंबो कोविड सेंटरमधील ७० ऑक्सिजन प्लांट उभारण्याची निविदा प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या निविदेत नमूद केलेल्या कामांपैकी काही ठिकाणी सीएसआर निधीचा वापर करण्यात आला. त्यामुळे सीएसआर निधीतून होणाऱ्या प्रकल्पांची कामे या निविदेतून वगळण्याची प्रक्रियाही सुरू आहे.
(हेही वाचाः आता ऑलिम्पिकसाठी जाणा-या खेळाडूंना मुंबईत अशी मिळणार लस)
इथे आहेत ऑक्सिजन प्लांट
मुंबईतील चार रुग्णालये व एका कोविड सेंटरमध्ये सीएसआर निधीतून ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहेत. महापालिकेचे कस्तुरबा रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय, विलेपार्ले येथील डॉ. कूपर रुग्णालय आणि वरळीतील नेहरु विज्ञान केंद्र येथील कोविड आरोग्य केंद्र या पाच ठिकाणी महापालिकेच्या वतीने ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहेत. त्यासाठी आरती इंडस्ट्रीज, घारडा केमिकल्स, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लिमिटेड, सारेक्स फाऊंडेशन, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, डी डेकोर होम फॅब्रिक्ज प्रा. लि. आणि मारवाह स्टील प्रा. लिमिटेड या सात कंपन्यांनी महापालिकेला सहकार्य केले आहे.
वातावरणातील हवा शोषून दररोज एकूण ६.९३ मेट्रिक टन प्राणवायू उत्पादित होणाऱ्या या प्रकल्पांचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे मागील आठवडयात करण्यात आले. पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नांतून या सात दात्यांनी हे प्लांट महापालिकेला तातडीने उपलब्ध करुन दिले.
(हेही वाचाः मुंबईत १२ रुग्णालयांमधील ऑक्सिजन प्लांट कधी होणार सुरू?)
देखभालीसाठी निविदा
विशेष म्हणजे महापालिकेच्यावतीने ऑक्सिजन प्लांटची उभारणी करताना पुढील पाच वर्षांच्या देखभालीच्या कामांसाठी निविदा काढली जाते, त्याप्रमाणे पात्र कंत्राटदाराला कामे बहाल केली जातात. त्यामुळे सीएसआर निधीतून केवळ प्लांट उभारला जात असून त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित दात्यांकडून किंवा प्लांट उभारण्याचे काम करणाऱ्या कंपनीकडून केली जात नाही. या देखभालीची जबाबदारी ही महापालिकेलाच करावी लागत असून, ज्या रुग्णालयांमध्ये सीएसआर निधीतून अशाप्रकारे प्रकल्प उभारले आहेत, तिथे आता त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पाच वर्षांकरता निविदा मागवण्याचा विचार सुरू आहे.
कोविड सेंटरमध्ये प्लांट उभारणीस मदत
महापालिकेच्या काही वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार, महापालिकेला ज्या कंपन्या सीएसआर निधीतून प्लांट उभारण्यास मदत करतात. त्यांची मदत महापालिकेने जरुर घ्यावी. पण ती मदत आपल्या रुग्णालयांमध्ये न घेता सर्वप्रथम जंबो कोविड सेंटर व इतर सेंटरमध्ये घ्यावी. जेणेकरुन कोविड सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या प्लांटच्या देखभालीचे कंत्राट दोन ते तीन वर्षे अशाप्रकारे देता येईल. यामध्ये जर कोविड सेंटर बंद करावे लागले, तरी महापालिकेचे नुकसान होणार नाही. परंतु त्यानंतरही ज्या कंपन्या सीएसआर निधीतून अशाप्रकारचे प्लांट उभारण्यास तयार असतील, त्यांच्यावर प्लांट उभारणीसह पुढील तीन वर्षांच्या देखभालीची जबाबदारी सोपवली जावी.
(हेही वाचाः शिवडीकरांचा पाणीपुरवठा पूर्ववत करणाऱ्या जल अभियंत्यांचा महापौरांकडून सत्कार)
देखभालीची कामेही त्याच कंपनीला द्यावीत
त्यामुळे ज्या कंपनीकडून हे काम करुन घेतले जाईल त्यांच्यावरच ही जबाबदारी सोपवल्यास तो प्लांट हाताळणे सोपे जाते. परंतु प्लांट एकाने उभारायचा आणि दुसऱ्याने त्यांची देखभाल व दुरुस्तीचे काम करायचे यामध्ये देखभालीसाठी नियुक्ती केलेली कंपनी हा प्लांट कसा चुकीच्या पध्दतीने बनवला आहे, हेच दाखवण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो. तर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आपला स्वनिधी वापरण्यामागील उद्देश म्हणजे महापालिका ज्या कंत्राटदाराला नियुक्त करते, त्यांना प्रारंभीच पाच वर्षांच्या देखभालीचे काम देऊन टाकते. ज्यामध्ये तो प्रकल्प चांगल्याप्रकारे हाताळला जातो. त्यामुळे भविष्यात सीएसआर निधीचा वापर कोविड सेंटरमध्ये करताना पुढील तीन वर्षांच्या देखभालीच्या कामांचाही समावेश त्यात करण्याची गरज असल्याचेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community