देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य सरकारतर्फे ७५ ठिकाणी नवीन नाट्यगृहे बांधण्यात येतील, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाट्यगृहांचे येत्या दोन वर्षांमध्ये नूतनीकरण केले जाईल, असेही नमूद केले.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ६२व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सोमवारी नांदी झाली. त्यावेळी सर्व केंद्रावरील स्पर्धकांना दृकश्राव्य माध्यमाद्वारे शुभेच्छा देताना मुनगंटीवार बोलत होते. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर हे सांस्कृतिक कार्य विभागाचे एकमेव नाट्यगृह आहे. राज्यातील इतर सर्व नाट्यगृहे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची आहेत. त्यामुळे ही नवीन नाट्यगृहे उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेच्या पारितोषिकांच्या रकमांमध्ये वाढ, परीक्षकांच्या मानधनामध्ये वाढ इत्यादी मुद्द्यांबाबतही विचार केला जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी…
सातत्याने आयोजित होणारी राज्य नाट्य स्पर्धा राज्यातील महत्त्वाची सांस्कृतिक चळवळ असून यातून अनेक महत्त्वाची नाटके आणि रंगकर्मी उदयास आले आहेत. या स्पर्धेची तिकिटे १५ रुपये आणि १० रुपये, अशा अतिशय अल्प दरात उपलब्ध असून कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community