सायबर गुन्हेगारांकडून साई भक्तांची लूट? ‘हे’ आहे श्री साईबाबा संस्थानाचे म्हणणे

साई भक्तांकडून अन्नदानाच्या नावाखाली ऑनलाईन देणग्या मागवल्या जात आहेत, अशा तक्रारी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या.

देशभरात सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन लूटमार सुरू असताना, या गुन्हेगारांकडून आता साई भक्तांना लक्ष्य केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साई संस्थानच्या नावाखाली सायबर गुन्हेगार साई भक्तांकडून मोठ्या रक्कमेच्या देणग्या उकळत असल्याची बाब शिर्डी साई संस्थानच्या लक्षात आल्यानंतर, साई संस्थानाकडून साई भक्तांनी अशा भामट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशी होते लूट

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या आदेशावरुन ५ एप्रिल २०२१ पासून शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. या परिस्थितीत श्री साईबाबा सेवाभावी संस्थान शिर्डी या नावाच्या संस्थेकडून, गुरुवारचे अन्नदान या आशयाखाली देशभरातील साई भक्तांकडून ऑनलाईन, पे टि एम, गुगल पे च्या माध्यमातून देणगीची मागणी केली जात आहे. मात्र या संस्थेशी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांचा काहीही संबंध नसल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली आहे.

(हेही वाचाः ‘ऑनलाईन’ व्यवहार करताना ‘फसवणूक’ कशी टाळाल? वाचा सविस्तर माहिती)

श्री साईबाबा संस्थानकडून जनतेला आवाहन

श्री साईबाबा संस्थान या नावाखाली साई भक्तांकडून अन्नदानाच्या नावाखाली ऑनलाईन देणग्या मागवल्या जात आहेत, अशा तक्रारी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची शाहनिशा केल्यानंतर, या संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी एक पत्रक काढून, साई भक्तांनी अशा बोगस संस्थांच्या फसवणुकीला बळी पडून नका, असे आवाहन केले आहे. या संस्थांशी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांचा काडीमात्र संबंध नसल्याचे बगाटे म्हणाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here