बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर बुधवारी चक्रीवादळात होत असल्याचे भारतीय वेधशाळेने जाहीर केले आहे. मात्र या चक्रीवादळामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यात ऐन थंडीच्या मोसमात हलक्या पावसाची शक्यता भारतीय वेधशाळेने व्यक्त केली आहे. ८ डिसेंबरला कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होईल. यामुळे ८ डिसेंबरला राज्यात कोकणात तर दुस-या दिवशी ९ डिसेंबरला मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस होईल, असा अंदाज भारतीय वेधशाळेने व्यक्त केला आहे.
( हेही वाचा : शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी होणार ‘या’ तारखेला! )
सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची थोडी वाढ झाल्याचे भारतीय वेधशाळेने दुपारी जाहीर केलेल्या अंदाजपत्रात स्पष्ट केले. गुरुवारी ८ डिसेंबरला तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशातील किनारपट्टीजवळ वादळ धडकण्याची शक्यता आहे. परंतु चक्रीवादळाची तीव्रता तसेच जमिनीवर कोणत्या भागांत हे वादळ धडकेल, याबाबत बुधवारी सकाळी माहिती देण्यात येईल असे वेधशाळेच्या अधिका-यांनी सांगितले.
महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत ऐन थंडीच्या मोसमात पावसाची शक्यता आहे. आता थंडीलाही ब्रेक लागत थोडी तापमानवाढ दिसून येईल, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. राज्यात पुढील तीन दिवस किमान तापमानात चार अंशाने तर कमाल तापमानात दोन अंशाने वाढ जाणवू शकते.
Join Our WhatsApp Community