सायरस मिस्त्रींच्या अपघातग्रस्त गाडीचा किती होता वेग? मर्सिडीजने दिली माहिती

171

टाटा समूहाचे माजी प्रमुख आणि उद्योजक सायरस मिस्त्री यांचा अलीकडेच पालघरजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज गाडीला झालेल्या अपघातामागे नेमके कारण काय याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. दरम्यान यासंदर्भात आता मर्सिडीज कंपनीने आपला अहवाल दिला आहे.

मर्सिडीज बेन्झने पाठवला अहवाल

मर्सिडीज बेन्झ कारने अहमदाबादहून मुंबईकडे येताना पालघरजवळील चारोटी येथे मिस्त्री यांच्या गाडीचा 4 सप्टेंबर रोजी भीषण अपघात झाला. या अपघातात मिस्त्री यांच्यासह जहांगीर पंडोल यांना देखील आपले प्राण गमवावे लागले. या अपघाताच्या तपासाचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर मर्सिडीज बेन्झ कारमधील डेटा चीप ही तपासासाठी जर्मनीला पाठवण्यात आली होती. आता मर्सिडीजने दिलेल्या अहवालात मिस्त्री यांची कार ताशी 100 किमी. वेगाने जात असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच अपघात होण्याच्या पाच सेकंद आधी ब्रेक लावण्यात आला होता, असे सांगण्यात आले आहे.

(हेही वाचाः सुषमा अंधारेंनी ओकली गरळ, हिंदुत्वविरोधी भूमिकेवरुन उद्धव ठाकरे काय करणार?)

कारची पाहणी होणार

पोलिसांनी मर्सिडीज कंपनीकडे या अपघाताबाबतची माहिती मागवली होती. यामध्ये गाडीचा ब्रेक नेमका कधी दाबण्यात आला याबाबतची माहिती पोलिसांनी कंपनीकडून मागितली होती. दरम्यान हॉंगकॉंगमधील एक पथक येऊन या अपघातग्रस्त कारची पाहणी करुन अहवाल देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस यंत्रणांकडून सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.