कोविडची दुसरी लाट अद्यापही न ओसरल्याने मुंबईसह राज्यात ब्रेक द चेन मिशन अंतर्गत कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात येत आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये दुकान, मॉल, शॉपिंग सेंटर नियोजित वेळेत सोशल डिस्टन्सिंग राखून सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. तरीही मालाड लिंक रोडवरील ‘डी मार्ट’मध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर ते सील करण्यात आले आहे. पी/उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर मकरंद दगडखैर यांनी ‘डि मार्ट’वर कारवाईचा बडगा उगारला.
डी मार्टच्या विरोधात तक्रार
मुंबईमध्ये ब्रेक द चैन अंतर्गत महापालिकेने कोविड प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून जून २०२१मध्ये परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये दुकानदारांना दुकाने व आस्थापनांना ठराविक वेळेत खुली ठेवण्यास परवानगी देताना सुरक्षित अंतर राखण्याचे तसेच तोंडाला मास्क लावण्यासह विविध नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, मालाड लिंक रोड येथील डी मार्ट मध्ये कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन केले जात नसल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पी उत्तर विभागाच्या आरोग्य, दुकान व आस्थापनांसह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता तिथे प्रचंड गर्दी दिसून आली. याठिकाणी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग राखले गेले नव्हते, तसेच वस्तुंचे बिल बनवणाऱ्या स्टाफकडून मास्क लावले नसल्याची बाब समोर आली आहे.
(हेही वाचा : भाजप नगरसेवकांना डॅमेज करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न!)
एकाच वेळी ५०० ग्राहक आढळले
त्यामुळे पी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी या ‘डी मार्ट’ला सोशल डिस्टन्सिंग न राखणे तसेच मास्क न लावल्याप्रकरणी नोटीस बजावत ते सिल केले आहे. ‘डी मार्ट’बाबत पोलिस तसेच नागरिकांकडून वारंवार तक्रार येत होत्या. त्यानंतर डी मार्टच्या व्यवस्थापकांना नियमांची आठवण करून देत पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतरही त्यांच्याकडून पालन होत नव्हते. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून ‘डी मार्ट’वर महापालिकेचे अधिकारी पाळत ठेवून होते. त्यामुळे शनिवारी याठिकाणी एकाच वेळी पाचशेहून अधिक माणसे आढळून आली तसेच त्यातील काहींनी मास्क धारण केला नव्हता. त्यामुळे वारंवार सुचना करूनही कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यामुळे हे डी मार्ट सेंटर सील करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दगडखैर यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community