आज दादर बंद: फेरीवाल्यांना व्यवसाय बंद ठेवण्याच्या पोलीस आणि महापालिकेच्या सूचना

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या स्मृतिदिनानिमित्त दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मृतिस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात होणारी शिवसैनिकांची गर्दी लक्षात घेता दादर परिसर बंद ठेवण्याच्या सूचना स्थानिक पोलीस आणि मुंबई महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांना केल्या असल्याची माहिती मिळत आहे. दादरमधील सर्व फेरीवाल्यांना व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना केल्याची माहिती मिळत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १३ खासदार शिवसेनेतून फुटल्यानंतर प्रथमच बाळासाहेबांचा स्मृती दिन येत आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पोलीस आणि महापालिका प्रशासनाने  दादर परिसर बंद ठेवण्याचा निर्णय घेत याबाबतच्या सूचना केल्या असल्याने दादर परिसर मोकळा ठेवला जाणार आहे.
शिवसेना आपला मूक बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कार केलेल्या जागेशेजारीच बाळासाहेबांचे स्मृती स्थळ उभारण्यात आले. या स्मृती स्थळी शिवसैनिक हे २३ जानेवारी रोजी बाळासाहेबांची जयंती आणि १७ नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी मुंबई सह राज्याच्या कानाकोपऱ्यातून वंदन करण्यासाठी येत असतात.
परंतु शिवसेनेची दोन छकले पडून शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना हे पक्ष स्थापन झाल्यानंतर पहिलाच स्मृतिदिन  होत आहे. शिवसेना फुटल्यानंतर खरी शिवसेना कुणाची याबाबतचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे दोन्ही गटांसाठी अस्तित्वाची लढाई असून या स्मृती स्थळावर शिवसेनेने आधीच हक्क गाजवायला सुरुवात केल्याने बाळासाहेबांच्या शिवसेना गटाला याठिकाणी येण्यास अटकाव केला जाऊ शकतो. यातून दोन्ही गट आमनेसामने येत बाळासाहेब कुणाचे या मुद्द्यावरून राडेबाजी होऊ शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात याठिकाणी येणाऱ्या शिवसैनिकांची संख्या पाहता हा परिसर मोकळा ठेवण्याच्या दृष्टिकोनातून दादर बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पोलीस आणि महापालिका जी उत्तर विभागाने घेत प्रत्येक फेरीवाल्यांना तोंडी आदेश तथा सूचना दिल्याची माहिती मिळत आहे.

तर दोन्ही गट समोरासमोर येऊन काही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सुरक्षेचा उपाय म्हणून फेरीवाल्यांमुळे होणारी दादरची गर्दी कमी करण्यासाठी दादर बंद ठेवण्याच्या सूचना केल्याचे बोलले जात आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here