दादर पश्चिम येथील रानडे मार्गावरील एक दिवस आड याप्रकारे दुचाकी उभ्या करण्यात येतात. मात्र या दुचाकी गाड्यांच्या आड फेरीवाल्यांनीच आता पदपथासह रस्ते अडवल्याने रेल्वे स्थानकाच्या आसपास आपल्या दुचाकी वाहने स्थानिकांना पार्क करता येत नाही. परिणामी फेरीवाल्यांकडूनच रस्ते अडवले जात असल्याने वाहतूककोंडी होऊन जनतेलाही चालण्यास जागा राहत नाही. त्यामुळे पार्किंगच्या आड येणाऱ्या फेरीवाल्यांवर महापालिका कधी कारवाई करणार असा प्रश्न स्थानिकांकडून केला जात आहे. (Dadar Hawkers)
रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसरात फेरीचा व्यवसाय करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पूर्णपणे बंदी असून प्रत्यक्षात या आदेशाचे पालन महापालिकेकडून केले जात नाही. दादर पश्चिम येथील रानडे मार्गावर केशवसूत उड्डाणपूल ते नक्षत्र मॉल आणि सिग्नलपर्यंत एक दिवस आड याप्रमाणे वाहने उभी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या भागातील स्थानिकांना आपली दुचाकी वाहने रेल्वे स्थानकापर्यंत उभी करून रेल्वेने प्रवास करता यावा याकरता रानडे मार्गावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. (Dadar Hawkers)
(हेही वाचा – PM Modi श्रीनगरमध्ये! १५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची केली पायाभरणी)
वाहतूक पोलिसांनी करायला हवी कारवाई
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात घेतलेल्या या निर्णयानुसार आजही सुरु असलेल्या या पार्किंगचा आसरा घेत पदपथासह रस्त्यावर उभे राहून फेरीवाले व्यवसाय करू लागले आहेत. या रस्त्यावर पदपथावर व्यवसाय करणारे फेरीवाले पदपथासह अडीच ते तीन फुटांची जागा सोडून दुचाकी वाहने उभे करण्यास भाग पाडतात. या दुचाकीच्या पुढेही रस्त्यावर फेरीवाले उभे राहून व्यवसाय करत असल्याने रस्त्यावरुन वाहने जाण्यास रस्ताच शिल्लक राहत नसून लोकांचा चालण्यासही जागा नसल्याने रेल्वे प्रवाशांसह स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या मार्गावर एक दिवसाआड दुचाकी वाहने पार्क करण्याची व्यवस्था असली तरी ज्या बाजूला पार्किंगची व्यवस्था आहे, त्याच्या विरुद्ध दिशेला रस्ता मोकळा राहत नाही. त्याठिकाणी दुचाकी वाहने उभीच असतात. तसेच विरुद्ध दिशेला दुचाकी नसतात त्या जागांवर फेरीवाले आपली वाहने उभी करून त्याआडून व्यवसाय करत असल्याचे दिसून येत आहे. (Dadar Hawkers)
मुळात दीडशे मीटर परिसरात फेरीवाल्यांना (Dadar Hawkers) बसण्यास बंदी असताना महापालिकेने जर त्यांच्यावर कारवाई केली तर स्थानिकांना पदपथालगत रस्त्यावर आपली दुचाकी वाहने उभी करता येतील. ज्यामुळे वाहतुकीसह जनतेला चालण्यास रस्ता मोठ्या प्रमाणात मोकळा मिळेल असे दुकानदारांसह स्थानिकांचे म्हणणे आहे. दादर व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील शाह यांनी याबाबत बोलतांना असे स्पष्ट केले की, आज दादरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आपल्या इमारतीबाहेर आपल्या दुचाकी तसेच चारचाकी वाहने उभी करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. रानडे मार्गावरील दुचाकी पार्किंगची व्यवस्था ही स्थानिकांसाठी केली होती. त्यामुळे स्थानिक रहिवाशी नियमानुसार आपली वाहने उभी करतात. परंतु ज्या दिवशी ज्या बाजूला वाहने लावण्यास बंदी आहे आणि तिथे जर वाहने असतील तर त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई करायला हवी. परंतु वाहतूक पोलिसांकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. आज दादरमध्ये रस्त्यावरील जागा फेरीवाल्यांनी अडवल्या असून स्थानिकांनी आपली वाहने दुसऱ्या बाजुला उभी करावी लागतात, त्या वाहनांवर पोलिस कारवाई करतात आणि पोलिसांना विचारले तर ते सांगतात तुम्ही त्या फेरीवाल्यांना सांगा म्हणून. हा गंभीर प्रकार असून रानडे मार्गासह स्टेशन परिसरातील दादरमधील फेरीवाल्यांवर कारवाई केल्यास स्थानिकांना वाहने उभी करण्याची व्यवस्था होऊ शकते, असे त्यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलतांना स्पष्ट केले. (Dadar Hawkers)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community