मुंबईत कोरोनाचे निर्बंध शिथिल करत पुन्हा एकदा दुकाने, हॉटेल्स खुली केली असली तरी अनेक ठिकाणी पुन्हा एकदा मुंबईकरांकडून बेशिस्तपणा आणि निष्काळजीपणाचे वर्तन घडू लागले आहे. कोविड काळात सर्व प्रकारचे निर्बंध असतानाही फेरीचा व्यवसाय करणाऱ्यांकडून हे निर्बंध उठल्यानंतर कोविड नियमांचे पालन होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी फेरीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींकडून मास्क लावला जात नसून त्यांना मास्क लावण्याची विनंती केल्यानंतरही ‘कोविड आहे कुठे? कोरोना निघून गेला’, असे सांगत उर्मट उत्तर दिली जात आहेत. त्यामुळे दादरमधील वाढती गर्दी आणि पुन्हा अशा बेशिस्त वर्तनामुळे कोविडच्या आजाराला एक प्रकारे निमंत्रण दिले जात आहे का, असा सवाल जनतेकडून व्यक्त केला जात आहे.
कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन
मुंबईत मागील आठवड्यांपासून कोविड निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर सर्व दुकाने, हॉटेल्स, आस्थापना, कार्यालये यांसाठी दोन डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांसाठी रेल्वे लोकल सेवाही खुली करण्यात आली आहे. परंतु पुन्हा एकदा जनजीवन सुरळीत होत असतानाच दादरमध्ये गर्दी दिसून येत आहे. मात्र, ही गर्दी होत असली तरी कुठेही कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन होताना दिसत नाही. दादर पश्चिम येथे स्थानकाला लागून फेरीवाले बसत असून प्रवाशांना स्थानकांतही शिरण्यास जागा दिली जात नाही. रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरात एकही फेरीवाला नसावा असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असतानाही महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.
(हेही वाचा : गोवंश नामशेष करण्यासाठी बैलगाडा शर्यतीवर बंदी! आमदार पडळकरांचा गंभीर आरोप)
‘कोरोना आहे कुठे? तो कधीच निघून गेला!’
दुसरीकडे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांकडून कुठेही मास्कचा वापर केला जात नाही. मास्क लावण्यासंदर्भात त्यांना जेव्हा वस्तूंची खरेदी करणाऱ्यांकडून मास्क लावण्याची सुचना केली जाते, तेव्हा हे मास्क लावण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला जातो. ‘मुंबईत कोरोना आहे कुठे? कोरोना कधीच गेलाय. लस आली आता कोरोना राहिलेला नाही. उगाच मास्क कशाला लावायला सांगता’, अशीच उत्तरे काही फेरीवाल्यांकडून तसेच फुलविक्रेत्यांकडून दिली जात आहे. फुल विक्रेता आणि खरेदीदारामध्ये एका टोपलीचे अंतर आहे. परंतु त्यांच्याकडूनही मास्क न लावता फुलांची विक्री केली जात आहे. त्यामुळे भविष्यात या फुल विक्रेत्यांसह येथील सर्व फेरीवाले हे कोरोनाचे प्रसारक बनतील, अशी भीती याठिकाणी खरेदीला येणाऱ्यांकडून व्यक्त केली जाते. फेरीवाल्यांनी व्यवसाय करताना कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आणि या नियमानुसार मास्क लावणे बंधनकारक आहे. परंतु मास्क न लावता फेरीवाले एकप्रकारे कोविड नियमांचे उल्लंघन करत एकप्रकारे स्वत:च्या व्यवसायावर बंदी आणण्याचा प्रयत्न करत आहेत’, अशी प्रतिक्रिया काही दादरकरांकडून व्यक्त होत आहे.
Join Our WhatsApp Community