राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या आमदार निधीतील पहिला निधी हा छत्रपती शिवाजी महाराज पार्क(शिवाजी पार्क) मैदानावर कायमस्वरुपी विद्युत रोषणाई करण्यासाठी दिल्यानंतर, या निधीतून या विद्युत रोषणाईचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले.
सर्वप्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर विद्युत रोषणाई प्रकल्पाचे लोकार्पण केले. तर, मैदान परिसरातील जीर्णोद्धार केलेल्या पुरातन प्याऊचे लोकार्पण व कोनशिला अनावरण पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन केले. मैदान परिसरात केलेल्या विद्युत रोषणाईमध्ये उजळून निघणा-या परिसराचे अवलोकन करतानाच सर्व रोषणाई स्वयंचलित पद्धतीने व रंगीबेरंगी कशी संचालित होते, त्याची प्रत्यक्ष पाहणीही मुख्यमंत्र्यांनी केली.
सुमारे ६५ वर्षांनंतर प्रथमच महाराजांच्या पुतळ्यावर विद्युत रोषणाई
छत्रपती शिवाजी महाराज मैदान(शिवाजी पार्क) मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारुढ पुतळा सन १९६६ मध्ये उभारण्यात आला. परंतु या पुतळ्यावर आजपर्यंत कोणतीही विद्युत रोषणाई करण्यात आली नव्हती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर तसेच या मैदान परिसरात कायमस्वरुपी विद्युत रोषणाई करण्यात यावी, असा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या जी/उत्तर विभागाने हा प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे.
तब्बल सव्वा कोटींचा खर्च
मुख्यमंत्री महोदयांच्या आमदार निधीतून सुमारे १ कोटी २५ लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प साकारला आहे. यामध्ये ५ वर्षांचा परिरक्षण खर्चदेखील समाविष्ट आहे. ही रोषणाई कायमस्वरुपी आहे. तसेच स्वयंचलित व विविधरंगी म्हणजे रंग बदलत्या स्वरुपाची आहे.
महाराजांच्या पुतळयाच्या चारही बाजूला जळ्यत्या मशालींचे दिवे
प्रामुख्याने, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा सर्व बाजूंनी विद्युत रोषणाईने उजळावा, म्हणून विविध रंग बदलणारे एलईडी प्रोजेक्टर दिवे लावण्यात आले आहेत. पुतळ्याच्या पदपीठावर (pedestal) विविध रंग बदलणारे एलईडी वॉल वॉशर दिवे लावले आहेत. पुतळ्याच्या पदपीठावरील खोबणीत एलईडी स्ट्रीप लावली आहे. पुतळ्याच्या चारही बाजूंस जळती मशाल भासेल, अशारितीने दिवे बसविण्यात आले आहेत.
भूमिगत दिवे
- पुतळ्याच्या आजुबाजूस असलेल्या उद्यानात एलईडी स्पाईक दिवे लावले आहेत.
- पुतळ्याच्या पदपीठावर रेषीय भूमिगत दिवे लावण्यात येणार आहेत.
- पुतळ्याच्या आजुबाजूच्या पदपथाची शोभा वाढवण्यासाठी ४२ बहुरंगी एलईडी ग्लोब दिवे बसविले आहेत.
माँसाहेबांचा पुतळाही प्रकाशमान
बेंगाल क्लब परिसरातील धबधबा तसेच झाडांवर रंग बदलणारे एलईडी विद्युत दिवे लावले आहेत. मैदानाच्या पदपथास लागून सुशोभित असे २५ बोलार्डस (छोटेखानी खांब) लावले आहेत. मैदान परिसरातील ७ प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक भित्तीचित्रं, दीपस्तंभ आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे पुतळा या सर्व ठिकाणी एलईडी विद्युत दिवे लावण्यात आले आहेत.
ते दिवे इटलीतील
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरात गोबो लाईट्स प्रोजेक्शन लावण्यात येणार आहे. मैदानाच्या दोन्ही बाजूस असलेले सी. रामचंद्र चौक व वसंत देसाई चौक यांचे सौंदर्यीकरण व रोषणाईचे काम प्रगती पथावर आहे. ही सर्व विद्युत रोषणाई करण्यासाठी दिव्यांसह इतर सर्व साहित्य हे इटली येथून नेरी या आंतरराष्ट्रीय कंपनीकडून मागविले आहेत. या सर्व साहित्याला आंतरराष्ट्रीय मानांकन आहे. सर्व विद्युत दिवे आणि साहित्य यांस एकूण ५ वर्षांची हमी आहे. प्रकल्प खर्चामध्ये प्रत्येक वर्षाची अर्थात वार्षिक परिरक्षण किंमत देखील समाविष्ट आहे.
१०० वर्षांची पुरातन प्याऊ भागवणार आता तहान
छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील कबड्डी असोसिएशन येथे स्थित १०० वर्षांचा वास्तूवारसा असलेल्या पुरातन प्याऊचा देखील जीर्णोद्धार करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर येणारे खेळाडू तसेच परिसरात येणाऱया नागरिकांना पाणी पिण्याची सुविधा म्हणून ही प्याऊ उपयोगात येणार आहे. प्याऊमधून २४ तास शुद्ध व स्वच्छ पाणी मिळेल. प्याऊच्या जीर्णोद्धासह या सुविधेसाठी एकूण २० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community