दादर पश्चिम फेरीवाला : महापालिका आणि पोलीस अॅक्शन मोडमध्ये, पदपथांवरील अनधिकृत स्टॉल्ससह दुकानांच्या बाहेरील वाढीव प्रदर्शनी भागही तोडले

मुंबई महापालिकेने आता रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांविरोधातील धडक कारवाई हाती घेतली असून गुरुवारी दादर पश्चिम येथील पदपथांवरील फेरीवाल्यांचे अनधिकृत स्टॉल्ससह बांधून ठेवले. साहित्य हटवून पदपथ मोकळ्या करून टाकल्या. एवढेच नव्हेतर अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोरील प्रदर्शनी भाग वाढवला होता, त्यावरही धडक कारवाई करून फेरीवाल्यांसह दुकानदारांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत एक प्रकारची दादरच्या सौंदर्यात बाधा आणणारी जळमटे दूर करण्याचा प्रयत्न केला. महापालिका व पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमुळे दादरमधील स्थानिकांसह रेल्वे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला.

दादर रेल्वे  स्थानक पश्चिमेच्या दिशेला असणाऱ्या फेरीवाल्यांनी रेल्वे स्थानकाच्या परिसरासह आसपासच्या  रस्त्यावर विळखा घातला होता. या फेरीवाल्यांनी पदपथांसह रस्तेही अडवल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी असल्याने याच्या कडक अंमलबजावणीसाठी महापालिका जी उत्तर विभाग व  शिवाजी पार्क पोलिस आदींच्या माध्यमातून दादर रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली.

(हेही वाचा Maharashtra budget 2023-2024 : तीर्थस्थळांसाठी भरीव तरतूद; महाराष्ट्रातील पाचही ज्योर्तिलिंगांचे संवर्धन)

जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे आणि  सहपोलिस आयुक्त कुंभारे आणि शिवाजी पार्कचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करत पदपथांवर बांधून ठेवलेले सामान व अनधिकृत स्टॉल्स हटवण्यात आले. रानडे मार्ग, डिसिल्व्हा रोड, जावळे मार्ग आणि कबुतर खाना ते प्लाझा सिनेमापर्यंतच्या एन.सी. केळकर मार्गावरील दुकानदारांनी वाढवलेला दुकानांचा प्रदर्शनी भाग आणि पदपथांवरील झाडांच्या आधारे केलेले सिमेंट विटांचे बांधकाम तोडून टाकले. यामध्ये काही अनधिकृत छोटे छोटे स्टॉल्सही तोडण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान  चारही रस्त्यांवरील तसेच पदपथांवरील सुमार १२५ फेरीवाल्यांसह दुकानांच्या वाढीव प्रदर्शनी भागांवर कारवाई करण्यात आल्याचे जी उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महापालिका व पोलिसांसह झालेल्या संयुक्त कारवाईमध्ये देखभाल विभाग, अतिक्रमण विभाग व परवाना विभाग आदींच्या माध्यमांतून कारवाई करण्यात आली आहे. सकाळी साडे दहा वाजल्यापासून सुरु झालेली ही कारवाई दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत सुरु होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here