बोरिवली पश्चिम येथील येरंगळ गावातीत खारफुटींवर भराव टाकणा-या पाच आरोपींना भल्या पहाटे तीन वाजून पाच मिनिटांनी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. या भरावात खारफुटीच्या अंदाजे १५ मीटर क्षेत्रावर भराव टाकल्याची माहिती वनविभागाचे कांदळवन कक्षाचे मुंबईच्या पश्चिम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एम. देशपांडे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून येरंगळ गावातील खारफुटींवर रात्री भराव टाकल्याची माहिती कांदळवन कक्षाच्या अधिका-यांना मिळाली होती. शुक्रवारी रात्रीपासून वनाधिका-यांनी या जागेवर पहारा ठेवला होता. शनिवारच्या मध्यरात्री दोन ट्रक आणि एक जेसीबीकडून सुरु असलेला भराव वनाधि-यांनी रंगेहाथ पकडला. या कारवाईत अन्सारी रफिक (१९), रमेश मौर्या (३०), राहुल जैस्वाल (३१), अजय खाडे (२०) आणि मोजेस बिंग (२५) या पाच आरोपींना वनाधिका-यांनी ताब्यात घेतले. आरोपींना आता न्यायालयीन कोठडी दिली गेल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी देशपांडे यांनी दिली.
(हेही वाचा बडतर्फ एसटी कामगारांना पुन्हा घेणार सेवेत…पण एकच अट!)
वनाधिका-यांची टीम
ही कारवाई कांदळवन कक्षाचे विभागीय वनाधिकारी आदर्श रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक (संरक्षण) राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या पश्चिम विभागाचे वनपरिक्षेत्रपाल. एस.एम.देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत वर्सोवाचे वनरक्षक संतोष जाधव, अंधेरीचे वनपाल हर्षल साठे, बोरिवलीचे वनपाल महादेव शिंगाडे, मालवणीचे वनरक्षक अजित परब आणि राकेश घवाळी यांनी सहभाग घेतला होता.
Join Our WhatsApp Community