पोलिसांना धोका वाढला, मुंबईत कोरोनाने १०१ पोलिसांचा मृत्यू!

गेल्या वर्षभरापासून मुंबई पोलिस दलात कोरोनामुळे १०१ जणांचा ​मृत्यू झाला असून ७ हजार ९९७ जणांना कोरोनाची बाधा झाली होती.

147

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली असून राज्यभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात येणार असल्यामुळे पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागणार आहे. मागच्या वर्षी कोरोनाच्या महासंकटात अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिसांना या वेळी मात्र धोका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवारी मुंबईतील वाकोला पोलिस ठाण्यातील एका पोलिस उप निरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका वर्षात एकट्या मुंबईत ७ हजार ९९७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती, तर १०१ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पुढे ही आकडेवारी वाढू नये, म्हणून पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलिसांना प्रथम स्वतःची काळजी घेऊन आपले कर्तव्य पार पाडा, असे आदेश काही दिवसांपूर्वी जारी केले आहेत.

दुसऱ्या लाटेतही पोलिसांची फरफट!

मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे गेल्या आठवड्यात मिनी लॉकडाऊन आणि आठवड्याच्या शेवटचे दोन दिवस मुंबईत कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे अगोदरच आर्थिक नुकसान सहन करावे लागल्यामुळे मुंबईतील व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला कडाडून विरोध करण्यास सुरुवात करून व्यापारी रस्त्यावर उतरले आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, नियंत्रणात रहावी, यासाठी पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. त्यात मास्क कारवाई, वाहनांवर कारवाई तसेच जमावबंदीच्या आदेशाची अंमलबाजवणी करण्यासाठी पोलिस दलाला फ्रंटलाईनवर उतरावे लागत आहे, त्यातून नागरिकांशी येणाऱ्या संपर्कांमुळे पोलिसांमध्ये कोरोना लक्षण आढळून येत आहे.

(हेही वाचा : नालासोपाऱ्यात कमालीचा हलगर्जीपणा! ऑक्सिजनअभावी ७ रुग्णांचा मृत्यू!)

वाकोला पोलिस ठाण्यातीलच पहिल्या कोरोनाबाधित पोलिसाचा मृत्यू!

सोमवारी वाकोला पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक मोहन दगडे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षभरात मुंबई पोलिस दलातील मृत्यूचा आकडा १०१ झाला असून ७ हजार ९९७ जणांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ हजार ४४२ असून ३० हजार ७५६ पोलिसांनी लसीचा पहिला डोस घेतला असून १७ हजार ३५१ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. गेल्या वर्षी मुंबई पोलिस दलातील कोरोनाने दगावलेला पहिला पोलिस हा वाकोला पोलिस ठाण्यातीलच होता, असे समजते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.