अन्न व औषध विभागाच्या रडारवर शीतगृहे; खजूर, जीरे ठेवले अस्वच्छ जागेत

नोव्हेंबर महिन्यापासून अन्न व औषध विभागाने अन्नाची साठवणूक करणा-या शीतगृहांवर छापा टाकण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी नवी मुंबईतील महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळातील मेमर्स पी.एम.कोल्ड स्टोरेज शीतगृहावर अधिका-यांनी धाड टाकली. या कारवाईत खजूर, जीरा अस्वच्छ जागेत ठेवल्याचे अधिका-यांच्या पाहणीत दिसून आले. अधिका-यांनी शीतगृहातील १ कोटी ७ लाख ३ हजार २५० रुपयांचा माल जप्त केला आहे. संपूर्ण वर्षभरातील अन्न व औषध विभागाची ही दुसरी सर्वात मोठी कारवाई आहे.

२ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील मेमर्स सावला फूड एण्ड कोल्ड स्टोरेज प्रायव्हेट लिमिटेड या शीतगृहात बुरशीजन्य बदाम आढळून आल्याने अन्न व औषध  प्रशासनाने तब्बल २९ कोटी ६७ लाख ७१ हजार ११० रुपयांचा माल जप्त केला होता. या कारवाईनंतरही अन्न व औषध प्रशासन विभागाचे शीतगृहांवर धाडी टाकण्याचे सत्र सुरुच आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ८ नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाने ८७ शीतगृहांना नोटीसा पाठवून अन्नपदार्थांची साठवणूक करताना काय खबरदारी घ्यावी, याबाबतची स्पष्ट कल्पना दिली. त्यानंतर आठवड्याभराच्या अंतराने अन्न व औषध विभागाच्या अधिका-यांनी मेमर्स पी.एम.कोल्ड स्टोरेज शीतगृहावर धाड टाकली. खजूर आणि जीरे अस्वच्छ ठिकाणी ठेवल्याने अधिका-यांनी १ लाख ३४ हजार ७३३ किलोचा खजूर तर २ हजार ८४८ किलोचा जि-याचा माल जप्त केला. या शीतगृहातून १३ अन्नपदार्थांचे नमुने जप्त करण्यात आले. हे नमुने प्रयोगशाळेला तपासण्यासाठी दिल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली. अहवालानंतर कारवाईची दिशा ठरेल, असेही सांगण्यात आले.

( हेही वाचा: शेतकऱ्यांना भरपाई देण्यास विमा कंपन्यांची टाळाटाळ )

कारवाईचे पथक 

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे तसेच ठाणे येथील कोकण विभागाचे अन्न विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी राहुल ताकाटे, अन्न सुरक्षा अधिकारी राम मुंडे, अरविंद खडके, प्रशांत पवार , दीप्ती राज-हरदास यांनी सहभाग घेतला.

अन्न व औषध विभागाचे आवाहन

अन्नपदार्थ खरेदी केलेल्या आस्थापनेतील पदार्थ्यांच्या गुणवत्ता व दर्ज्याबाबत ग्राहकांना शंका असल्यास अन्न व औषध विभागाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here