गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळावे, म्हणून आयुष्यभरकायम झटणारे दत्ता इस्वलकर यांचे निधन झाले. त्यांनी आयुष्यभर केलेल्या संघर्षामुळे हजारो गिरणी कामगारांना घरे मिळाली, मात्र हजारो कामगारांच्या घरांसाठी ते झगडत होते. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलनेही केली. त्यांची संपूर्ण हयात या प्रश्नात खर्च झाली. सरकारे बदलत गेली, पण प्रत्येक सरकारशी जुळवून घेत त्यांनी हा विषय जिवंत ठेवला. त्यांच्या यशाला आता कुठे यश मिळत असतानाच इस्वलकर यांच्या निधनाने गिरणी कामगारांचे नुकसान झाले आहे.
संघर्षाचा बुलंद आवाज शांत झाला!
मुंबईत गिरणी कामगारांच्या तीन पिढ्या कापड उद्योगासाठी राबल्या. मुंबईच्या जडणघडणीत त्यांचा वाटा सिंहाचा आहे. पहिल्यापासून कामगार हा कष्टकरी होता. 1982 मध्ये झालेला संप हा गिरणी कामगारांसाठी काळा अध्याय ठरला. काही जण गावी गेले, काही जण मुंबईत राहून नव्याने कष्ट करू लागले. भाज्या विकणे, वडा पाव विकणे असे व्यवसाय काहीजणांनी सुरू केले. कुणी हात गाडीवर मीठ विकूनही उदरनिर्वाह चालवला. काही कामगारांवर आत्महत्या करण्याचीही वेळ ओढवली. कामगार लढा देत राहिला, त्याचे जगणे जगत राहिला. या कामगारांच्या विचारांना दिशा देण्याचे काम दत्ता इस्वलकर यांनी केले. त्यांच्या संघर्षाचा ते आवाज झाले. आज त्या संघर्षाचा बुलंद आवाज शांत झाला आहे. राज्यभर विखुरलेल्या गिरणी कामगारांना शोधून त्यांची नोंदणी करून त्यांना मुंबईमध्ये आणि तेही गिरण्यांच्या जागेवर इमारती बांधून सरकारकडून गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी इस्वलकर यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्यासाठी दत्ता इस्वलकर यांना समाजभूषण पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. 2 मार्च 2020 ला म्हाडाच्या गिरणी कामगारांच्या घरासाठीची सोडत दत्ता इस्वलकर यांच्या हस्ते काढण्यात आली होती.
(हेही वाचा : गिरणी कामगारांसाठी खुशखबर, लॉटरीसाठी मुंबई बँकेची समन्वयक एजन्सी म्हणून नेमणूक!)
Join Our WhatsApp Community