कोविडवरील उपचारासाठी अँटीबॉडीज कॉकटेलला मान्यता! काय आहे ही उपचार पद्धत?

ऑक्सिजन आणि इतर महागड्या औषधोपचारांची गरज नसल्‍याने हा उपचार आर्थिकदृष्‍ट्या देखील फायदेशीर ठरणार आहे.

85

कोविडच्‍या संभाव्‍य तिसऱ्या लाटेच्‍या पार्श्‍वभूमीवर यशस्वी ठरलेल्या अँटीबॉडीज कॉकटेलच्या नवीन औषधोपचाराला जागतिक आरोग्य संघटना आणि ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता डॉक्टरांच्या सल्ल्याने या नवीन औषधोपचार पध्दतीचा वापर करण्यात येणार असून ,लसीकरणानंतर लाभलेल्या या नवीन औषधोपचारामुळे मुंबईतील कोविड रुग्णांना नवसंजीवनी मिळणार आहे.

काय आहे अँटीबॉडीज कॉकटेल?

कोविड-१९ चा पहिल्‍या व दुसऱ्या लाटेतील फैलाव नियंत्रित केल्‍यानंतर आणि कोविड प्रतिबंधक लसीकरणाला वेग दिल्‍यानंतर मुंबई महापालिकेने कोविडची संभाव्‍य तिसरी लाट आलीच तर ती तातडीने रोखण्‍यासाठी, कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाच्‍या(अँटीबॉडीज कॉकटेल) उपचार पद्धतीचा प्रयोग केला होता.

(हेही वाचाः मुंबईतील दूषित पाण्याचा टक्का वाढला, पण हे विभाग झाले दूषित पाणीमुक्त)

असा आहे फायदा

अंधेरीतील सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात सुरुवातीला २०० पेक्षा अधिक रुग्‍णांवर या पद्धतीने उपचार करण्‍यात आले. त्यामध्ये हा प्राथमिक प्रयोग यशस्‍वी ठरला होता. हे मिश्रि‍त औषध दिल्‍यानंतर फक्‍त एकाच (०.५ टक्‍के) रुग्‍णास प्राणवायू पुरवठ्याची गरज भासली होती, तर मृत्‍यू दरामध्‍ये तब्‍बल ७० टक्‍के घट झाली होती. एवढेच नव्‍हे तर रुग्‍णालयातील उपचारांचा कालावधी १३ ते १४ दिवसांवरुन कमी होऊन तो ५ ते ६ दिवसांवर आला होता. त्यानंतर रुग्णाच्या परवानगीने त्यांच्यावर अशा पध्दतीच्या औषधोपचाराचा वापर केला जात आहे.

सुलभ व प्रभावी उपचार पद्धती

हे अँटीबॉडीज कॉकटेल सलाईनद्वारे देण्‍यासाठी एका तासाचा अवधी पुरेसा असतो. त्‍या कालावधीत संबंधित रुग्‍णाचे थेट निरीक्षण करता येते. रुग्‍णालयात दाखल करुन न घेता, बाह्य रुग्‍णसेवा(ओपीडी) पद्धतीने देखील हे औषध देणे शक्‍य आहे. रेमडेसिवीर सारखी औषधे आणि स्‍टेरॉईडचा उपयोग टाळून हे अँटीबॉडीज कॉकटेल देणे शक्‍य असल्‍याने रुग्‍णांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. रुग्‍णालयात दाखल होण्‍याची गरज टाळून, ऑक्सिजन आणि इतर महागड्या औषधोपचारांची गरज नसल्‍याने हा उपचार आर्थिकदृष्‍ट्या देखील फायदेशीर ठरणार आहे, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला होता.

(हेही वाचाः राज्य सरकारचे ‘मिशन अनलॉक’: आता थिएटर्सचे दरवाजेही उघडणार)

महापालिका आयुक्‍त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्‍यासह राज्‍याचे कुटुंब कल्‍याण आयुक्‍त रामास्‍वामी यांच्‍या पुढाकाराने ही नवीन औषधोपचार पद्धती स्‍वीकारण्‍यात आली आहे. सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. महारुद्र कुंभार व अधिष्‍ठाता डॉ. बाळकृष्‍ण अडसूळ यांच्‍या निर्देशाखाली त्‍याची अंमलबजावणी करण्‍यात येत आहे.

अधिकृतपणे औषधोपचाराला सुरुवात

या नवीन औषधोपचार पध्दतीला जागतिक आरोग्य संघटना(डब्ल्यूएचओ) आणि ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची (डीसीजीआय)मान्यता मिळाली. याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या नवीन औषधोपचाराला डीसीजीआयची मान्यता मिळाल्याने आता आपण अधिकृतपणे या औषधोपचाराचा उपयोग करू शकतो. परंतु या उपचार पध्दतीचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केला जावा. कुणीही परस्पर या उपचार पध्दतीचा वापर करुन घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. कोविड रुग्णांवर हा उपचार करताना त्यांची परवानगी घेतली जाणार असून, त्यानंतरच संबंधित रुग्णावर या पध्दतीचा वापर केला जाणार असल्याचे काकाणी यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचाः हे माहीत आहे का? तुमच्या ‘परफ्युम’ मध्ये आहे व्हेल माशाची ‘उलटी’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.