2 ते 18 वयोगटासाठी ‘या’ लसीच्या चाचणीला मान्यता!

525 निरोगी स्वयंसेवकांवर ही चाचणी घेण्यात येणार आहे.

भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) मंडळातर्फे 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कोवॅक्सिनच्या लसीकरणाची चाचणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विषय तज्ञ समिती(एसईसी)ने केलेल्या शिफारशींनुसार काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर ही मान्यता देण्यात आली आहे. त्यानुलार 12 मे रोजी लस उत्पादक भारत बायोटेक लिमिटेडला 2 ते 18 वर्षे वयोगटासाठी कोवॅक्सिनच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्यातील मानवी चाचणी घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

अशी होणार चाचणी

भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड, हैद्राबाद(बीबीआयएल) ने 2 ते 18 वर्षे वयोगटासाठी कोवॅक्सिनच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्यातील लसीकरणासाठी मानवी चाचणी घेण्याचा प्रस्ताव दिला होता. 525 निरोगी स्वयंसेवकांवर ही चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीत , 0 दिवस आणि 28 दिवस दरम्यान अंतस्नायूमधून लसीचे दोन डोस दिले जातील. जलद नियामक प्रतिसाद म्हणून, हा प्रस्ताव विषय तज्ज्ञ समिती (एसईसी) कडून 11 मे रोजी विचारात घेण्यात आला. समितीने तपशीलवार विचारविनिम केल्यानंतर या मानवी चाचणीला सशर्त परवानगी देण्याची शिफारस करण्यात आली. लवकरच या लसींच्या चाचणीला सुरुवात करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः अखेर १८ ते ४४ वयोगटासाठीच्या लसीकरण मोहिमेला स्थगिती! )

राज्यात 5 लाख नागरिक कोवॅक्सिनच्या प्रतिक्षेत

राज्यात आतापर्यंत सुमारे १ कोटी ८४ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. सध्या राज्यात कोवॅक्सिन लसींचे ३५ हजार डोस शिल्लक आहेत आणि ४५ वर्षांवरील सुमारे ५ लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या(कोवॅक्सिन) प्रतिक्षेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांसाठी हे डोस पुरेसे नाही. त्यानुसार १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले कोवॅक्सिनचे २ लाख ७५ हजार डोसेस आणि शिल्लक ३५ हजार डोसेस असे एकूण सुमारे ३ लाख डोसेस ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी वापरण्यात येणार आहेत. तशा सूचना राज्यातील सर्व लसीकरण केंद्रांना दिल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here