DCM Ajit Pawar : धनगर, मेंढपाळ बांधवांची भटकंती थांबवण्यासाठी काळानुरुप सुधारणा आवश्यक

धनगर, मेंढपाळ बांधवांची फिरस्ती थांबवून त्यांच्या जीवनात काळानुरुप सुधारणा केली पाहिजे

127
DCM Ajit Pawar : धनगर, मेंढपाळ बांधवांची भटकंती थांबवण्यासाठी काळानुरुप सुधारणा आवश्यक
DCM Ajit Pawar : धनगर, मेंढपाळ बांधवांची भटकंती थांबवण्यासाठी काळानुरुप सुधारणा आवश्यक

धनगर, मेंढपाळ बांधवांची फिरस्ती थांबवून त्यांच्या जीवनात काळानुरुप सुधारणा केली पाहिजे. त्याअनुषंगाने मेंढ्यांच्या पालन-पोषणासाठी चराई क्षेत्रालगतची जमीन अर्धबंदिस्त निवाऱ्यासाठी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करुन दिल्यास मेंढपाळ, धनगर बांधवांच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण होऊ शकेल. यादृष्टीने पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (२१ ऑगस्ट) मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

राज्यातील धनगर, मेंढपाळ समाजाच्या समस्या सोडवणे तसेच विकासयोजनांच्या अंमलबजावणीबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीला माजी मंत्री तथा आमदार दत्तामामा भरणे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, मेंढपाळ धनगर विकास मंचचे अध्यक्ष संतोष महात्मे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, वनविभागाचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, इतरमागास व बहुजनकल्याण विभागाच्या सचिव अंशू सिन्हा, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. एच. एस. वसेकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक कांबळे आदींसह वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत मेंढपाळ धनगर विकास मंचाच्या वतीने धनगर बांधवांच्या समस्यांबद्दल सादरीकरण करण्यात आले.

धनगर बांधवांच्या आर्थिक विकासासाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण करण्याची गरज

बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मेंढपाळ समाज वर्षोनवर्षे भटकंतीचं जीवन जगत असून त्यांची फिरस्ती थांबवली पाहिजे. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. ज्याप्रमाणे शेळी, कुक्कुटपालनाच्या योजना राबवल्या जातात, त्याच धर्तीवर मेंढ्यासाठी अर्धबंदिस्त निवारा उपलब्ध केल्यास धनगर बांधवांची फिरस्ती थांबेल. यापुढच्या काळात धनगर बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्या लागतील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

(हेही वाचा – Students Attempted Suicide : ‘या’ कारणामुळे २२ विद्यार्थ्यांची आत्महत्या)

शेळी, कुक्कुटपालन योजनांच्या धर्तीवर मेंढ्यांसाठीही अर्धबंदिस्त निवारा योजना 

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, वाढत्या शहरीकरणामुळे गायरान जमिनी, चराऊ कुरणे आदी क्षेत्र कमी होऊ लागले आहे. चराई क्षेत्राची कमतरता ही धनगर समाजाची मोठी समस्या आहे. पावसाळ्यात शेतात पिके असतात आणि चारा उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत मेंढ्यांसाठी अर्धबंदिस्त निवाऱ्याची व्यवस्था प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करुन दिल्यास अनेक प्रश्न सुटू शकतील. अर्धबंदिस्त निवाऱ्यामुळे मेंढ्यांचं आरोग्य सुधारुन त्यांचं वजन वाढेल. मेंढ्यांच्या उत्तम संकरीत जाती निर्माण करणे शक्य होईल. यादृष्टीनं विचार करण्यात यावा. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.