देशातील 11 राज्यांमध्ये सेरोटाईप-2 डेंग्यूचा धोका वाढत असल्याचे शनिवारी आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. डेंग्यूच्या या वाढत्या धोक्यामुळए ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले जात आहे. याची गंभीर दखल घेण्यात आली असून, डेंग्यूचे रुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी सांगण्यात आले आहे. या 11 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे.
उपाययोजना करण्याच्या राज्यांना सूचना
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे या पार्श्वभूमीवर राज्यांना विविध सूचना करण्यात आल्या आहेत. लवकरात लवकर डेंग्यूचे रुग्ण ओळखणे, नागरिकांसाठी हेल्पलाईन्स कार्यान्वित करणे आणि अळीनाशके आणि औषधांचा पुरेसा साठा करण्यास आरोग्य विभागाकडून राज्यांना सांगण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव भूषण यांनी त्वरित तपासणी आणि आवश्यक सार्वजनिक आरोग्य कृतींकडे तातडीने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. पुरेसा रक्त आणि पेशींचा साठा राखण्यासाठी रक्तपेढ्यांना सतर्क करत, जलद प्रतिसाद पथके तैनात करण्याची शिफारस त्यांनी केली आहे.
(हेही वाचाः अरेरे! बाप्पाचे विसर्जन करायला गेले आणि ६ जण स्वतःच बुडाले!)
या राज्यांमध्ये सेरोटाईप-2 डेंग्यूचे आढळले रुग्ण
- आंध्र प्रदेश
- गुजरात
- कर्नाटक
- मध्य प्रदेश
- उत्तर प्रदेश
- महाराष्ट्र
- ओडिशा
- राजस्थान
- तामिळनाडू
- तेलंगणा
- केरळ
जनजागृती मोहिमेचे आवाहन
डेंग्यूला कारणीभूत असणारे एकूण चार प्रकारचे सेरोटाईप आहेत. त्यापैकी DENV-2 प्रकार अधिक घातक मानला जात असून, तो अंतर्गत रक्तस्रावास कारणीभूत ठरू शकतो. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी आणि डेंग्यूच्या लक्षणांवर लक्ष ठेवण्यासाठी जनजागृती करण्याची मोहीम हाती घेण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे.
(हेही वाचाः मुंबईकर झाले कोरोना फायटर… एकही लस न घेणा-यांच्या शरीरात आढळल्या इतक्या अँटिबॉडीज)
यासोबतच कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेताना राज्यांना सणासुदीच्या काळात नियंत्रण उपाययोजना राबवण्यास सांगण्यात आले आहे. काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्यामुळे लहान मुलांमध्ये संसर्ग होणार नाही, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community