विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई दैनंदिन स्वच्छता करतानाच लहान रस्ते, गल्लीबोळ, झोपडपट्टी व तत्सम वस्ती आदी ठिकाणी विशेष सामूहिक स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत ५ हजार ७८६ मेट्रिक टन इतका कचरा आणि राडारोडा (Debris) संपूर्ण मुंबईतून जमा करुन वाहून नेला आहे. यामध्ये ४ हजार १८३ मेट्रीक टन राडा रोडा अर्थात डेब्रीजचा समावेश असून मागील २०दिवसांमध्येच एवढा राडारोडा (Debris) जमा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
मुंबई महानगरातील प्रमुख परिसरांप्रमाणेच लहान रस्ते, गल्लीबोळ आणि सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास दिले आहेत. याअनुषंगाने, मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये आणि सर्व संबंधित खात्यांच्या सहकार्याने विशेष मोहीम राबवली जात आहे. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांचे परिसर, विसर्जन स्थळे इत्यादी ठिकाणी देखील अहोरात्र स्वच्छता राखण्याची कार्यवाही केली जात असल्याची माहिती उपायुक्त ( घनकचरा व्यवस्थापन ) चंदा जाधव यांनी दिली आहे.
या मोहिमेमध्ये सप्टेंबर महिन्यात आतापर्यंतचा विचार करता १ हजार ६०३ मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला, तर ४ हजार १८३ मेट्रिक टन इतका राडारोडा (Debris) उचलण्यात आला आहे. या मोहीमेमध्ये महानगरपालिकेच्या नियमित कामगारांसोबत बिगर शासकीय संस्थांचे ४२९ प्रतिनिधी , २० कंत्राटी कामगार अशा एकूण ४४९ अतिरिक्त मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाची दैनंदिन वाहने तसेच त्यासोबतीला जेसीबी, डंपर यासारखी १८१ अतिरिक्त संयंत्रेदेखील या मोहिमेमध्ये तैनात करण्यात आली आहेत. त्यात ३९ जेसीबी, ६६ डंपर आणि ७६ बंद स्वरूपाच्या लहान वाहनांचा (एससीव्ही) समावेश आहे.
स्वच्छता ही नियमित कामकाजाची बाब असून त्यामध्ये सातत्य राखले जायलाच हवे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त चहल, अतिरिक्त आयुक्त शिंदे यांनी दिले आहेत. त्याचे पालन करीत मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, कामगार हे स्वच्छतेसाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. सर्व संबंधित परिमंडळांचे सहआयुक्त, उप आयुक्त तसेच सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त ‘ऑन द स्पॉट’ भेटी देत मुख्य रस्ते, हमरस्त्यांसह अगदी गल्लीबोळात जाऊन तेथील दैनंदिन स्वच्छता कामांची प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत. हे सर्व अधिकारी दररोज आपापल्या कार्यक्षेत्रात किमान दोन तास पाहणी दौरे करत आहेत. विभागवार दौरे केल्यानंतर पाहणीमध्ये केलेल्या स्वच्छताविषयक सूचनांच्या अनुषंगाने त्याबाबत केलेल्या पूर्ततेची पुनर्तपासणी केली जात आहे. श्री.गणेशोत्सवात भाविक, नागरिक, पर्यटक यांना उत्तम दर्जाच्या स्वच्छतेचा अनुभव यावा, याकरिता प्रशासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांनी दिली आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community