घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयातील आयसीयू कक्षात उपचार घेत असलेल्या श्रीनिवास यल्लप्पा या २४ वर्षी तरुण रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याची घटना घडली. त्यानंतर या कक्षाच्या मागील बाजूस असलेली महापालिका चौकी आणि त्यातील भंगार, टाकाऊ सामान साफ करण्यात आले. या भंगार सामानामुळे या रुग्णालय परिसरात उंदरांचा वावर असल्याचा आरोप होत होता. तसेच हे भंगार सामान आणि महापालिका चौकी बंद करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून होत होती. परंतु उंदराच्या या प्रतापानंतर या भंगार सामानामुळे निर्माण झालेले त्यांचे अड्डे नष्ट करण्यात आले असून, हा परिसर स्वच्छ करत विभाग कार्यालयाने रुग्णालय व्यवस्थापनाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
त्या रुग्णाचा झाला मृत्यू
राजावाडी रुग्णालयाच्या आयसीयू कक्षाच्या मागील बाजूस महापालिकेची मेंटनन्स विभागाची चौकी आहे. त्यामुळे विभागात कोणतेही दुरुस्तीचे किंवा अन्य कामे केल्यानंतर काढलेले सामान, तसेच इतर साहित्य या चौकीच्या परिसरात जमा केले जायचे. त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात भंगारवजा सामानामुळे उंदरांचा वावर मोठ्या प्रमाणात होता. त्यातच चार दिवसांपूर्वी या रुग्णालयातील आयसीयू कक्षातील बेशुध्द रुग्णाच्या डोळ्याला उंदराने कुरतडल्याचा प्रकार उघडकीस आला. या रुग्णाची आधीच प्रकृती गंभीर होती, त्यानंतर बुधवारी रात्री या रुग्णाचा मृत्यू झाला.
(हेही वाचाः धक्कादायक! राजावाडी रुग्णालयाच्या आयसीयूत उंदराने रुग्णाचे डोळे कुरतडले! )
परिसर स्वच्छ, पण पुढे काय?
ही घटना घडल्यानंतर एन विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी पुढाकार घेत बुधवारी या चौकीतील सर्व जमा झालेले भंगार सामान अन्यत्र हलवले. तसेच हा परिसर स्वच्छ करुन चौकीचा ताबा रुग्णालयाला सोपवला. मागील तीन ते चार वर्षांपासून रुग्णालयातील चौकी हटवून ते भंगार सामान साफ केले जावे, अशी मागणी शिवसेना नगरसेविका डॉ. अर्चना भालेराव यांच्याकडून केली जात होती. परंतु तत्कालीन सहाय्यक आयुक्तांनी ही चौकी अन्यत्र हलवण्यास पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु आंबी यांनी तात्काळ दखल घेऊन रुग्णालय परिसरातील हे भंगार सामान हटवून परिसर स्वच्छ केला. मात्र, आता रुग्णालयातील कामगार याठिकाणी पुन्हा कचरा होणार नाही याची काळजी घेऊन किती स्वच्छता राखतात, हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे.
रुग्णाच्या बहिणीला महापालिका सेवेत कायमस्वरुपी सामावून घ्या
या रुग्णाची स्थिती गंभीर असली तरी महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे उंदराने त्याचे डोळे कुरतडले ही तेवढीच गंभीर बाब आहे. हा रुग्ण त्या कुटुंबातील एकमेव कमवती व्यक्ती होता. त्यामुळे या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, या रुग्णाची बहीण सध्या सेव्हन हिल्स रुग्णालयात कंत्राटी पध्दतीवर काम करत आहे. या मुलीला महापालिकेच्या सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्याची मागणी भाजपचे कुर्ला येथील नगरसेवक हरिष भांदिर्गे यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. भांदिर्गे यांनी या कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी यापूर्वी केली होती. त्यानंतर आता या मागणीबरोबरच मृत व्यक्तीच्या बहिणीला महापालिका सेवेत सामावून घेण्याची मागणी करत या कुटुंबाला आधार देण्याची विनंती प्रशासनाला केली आहे.
(हेही वाचाः मुंबईत सलग तीन दिवस एक लाख लसीकरण! )
Join Our WhatsApp Community