December 2023 Financial Deadlines : आर्थिक नियोजनासाठी डिसेंबरमध्ये ‘या’ तारखांवर लक्ष ठेवा 

म्युच्युअल फंडाचं नामांकन ते आधार अपडेट या महत्त्वाच्या कामांसाठी डिसेंबरमधल्या ‘या’ तारखा आहेत महत्त्वाच्या 

143
December 2023 Financial Deadlines : आर्थिक नियोजनासाठी डिसेंबरमध्ये या तारखांवर लक्ष ठेवा 
December 2023 Financial Deadlines : आर्थिक नियोजनासाठी डिसेंबरमध्ये या तारखांवर लक्ष ठेवा 

ऋजुता लुकतुके

आर्थिक नियोजनामध्ये तारखा पाळणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. बाकी बरीचशी कामं हल्ली ऑनलाईन होऊ शकतात. पण, ती कामही वेळच्या वेळी म्हणजे मुदतीच्या आत पार पडणं महत्त्वाचं असतं. त्या दृष्टीने डिसेंबर महिन्यात म्युच्युअल फंडाचं नामांकन आणि आधार कार्डातील माहितीचा अपडेट यासाठी महत्त्वाच्या तारखांवर एक नजर टाकूया…

डिसेंबरमधील ४ महत्त्वाच्या तारखा

म्युच्युअल फंडासाठी नामांकन

नामांकन म्हणजे गुंतवणूकधारकांच्या मृत्यूनंतर ते पैसे नामनिर्देशित व्यक्तीलाच मिळावेत यासाठी कायद्याने केलेली सोय. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या नावे नामांकनाची प्रक्रिया पूर्ण केलीत तर तुमच्या पश्चात ते पैसे त्या व्यक्तीला निर्धोक मिळतात. अगदी तुमच्या बँक खात्यापासून ते प्रत्येक आर्थिक गुंतवणुकीत तुम्ही नामांकन नोंदणी करू शकता.

म्युच्युअल फंडासाठी नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ इतकी आहे. यापूर्वी म्युच्युअल फंडासाठी ही मुदत सप्टेंबर २०२३ ही होती. पण, आता सेबीने मुदतवाढ देऊन ती ३१ डिसेंबर केली आहे. तुम्ही गुंतवणूक केलेल्या कुठल्याही म्युच्युअल फंडात तुम्ही नामांकन प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर तुमचे पैसे गोठवले जाऊ शकतात. तेव्हा हे काम लवकरात लवकर करा.

(हेही वाचा-Lexus LM 2023 : लेक्ससची नवी प्रिमिअम गाडी भारतात होतेय लाँच, किंमत बघून तुम्ही तोंडात बोटं घालाल)

आधारमधील माहिती अपडेट करणं

आधार कार्डातील कुठलीही माहिती अपडेट करायची असेल तर त्यासाठीची मुदत १४ डिसेंबर ही आहे. युआयडीएआय किंवा आधार प्राधिकरणाने मागचे काही महिने ग्राहकांना आधार मधील तुमचा पत्ता, मोबाईल नंबर अशी माहिती अपेडट करण्यासाठी आवाहन केलं आहे. १४ डिसेंबरपर्यंत तुम्ही माहिती अपडेट केलीत तर तुमचं काम मोफत होईल.

myAadharportal वर तुम्ही मोफत तुमची माहिती अपडेट करू शकाल. तेच जवळच्या आधार केंद्राची मदत घेतलीत तर तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावं लागेल. पण, आधारमधील माहिती अपडेट करणं हे महत्त्वाचं आहे. ही मुदत चुकवू नका.

वापरात नसलेले युपीआय आयडी

७ नोव्हेंबरला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पत्रक काढून बँका तसंच पेमेंट ॲपना वापरात नसलेले युपीआय आयडी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. एक वर्षापेक्षा जास्त काळ वापरात नसलेले आयडी या निर्णयानुसार, रद्द केले जाणार आहेत.

बंका तसंच पेमेंट ॲप आणि थर्डपार्टी ॲप प्रोव्हायडर्स यांना या कामासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. तेव्हा तुम्ही युपीआय खातं काही कारणांनी वापरत नसाल तर ते स्वत:हून बंद करा. किंवा एखाद्या व्यवहारासाठी वापरा म्हणजे कारवाई होऊन तुमचा युपीआय आयडी डिॲक्टिव्हेट होणार नाही. कारण, एकदा डिॲक्टिव्हेट झालेला युपीआय आयडी पुन्हा सुरू करणं जिकिरीचं आहे.

बँक लॉकर ॲगरीमेंट

रिझर्व्ह बँकेनं सर्व प्रकारच्या बँकांना बँक लॉकरच्या वापरासाठी नवीन नियम लागू केले आहेत. त्यानुसार, बँकांनी लॉकर सेवा घेणाऱ्या ग्राहकांकडून नव्याने अर्ज भरून घेणं गरजेचं आहे. लॉकरचे महिन्याचे शुल्क भरलं तरंच ग्राहकांना लॉकर वापरता येणार आहे. ज्या महिन्याचं शुल्क भरलं जाणार नाही, त्या कालावधीत तुम्हाला लॉकर सेवा मिळणार नाही. म्हणजे ना तुम्ही कुठलीही गोष्ट तिथे ठेवू शकाल, ना तिथून काढू शकाल. म्हणून लॉकर सेवा घेतली असेल तर बँकांबरोबर नव्याने करार करण्यासाठी ३१ डिसेंबर ही मुदत लक्षात ठेवा.

(हेही पहा –https://www.youtube.com/watch?v=RnH3Aa0mmCI)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.