आषाढी वारीबाबत पुढील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय! 

गेल्यावर्षी राज्य सरकारच्या आवाहनाला वारकरी संप्रदायाने चांगला प्रतिसाद दिला, ही कौतुकास्पद बाब आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

82

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपण सामना करत आहोत. राज्यातील कोरोना संसर्गाचा आलेख कमी होत असला तरी तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह, वारकऱ्यांच्या आरोग्याचा विचार आपल्याला करणे आवश्यक आहे. वारकरी संप्रदायातील मान्यवरांची मते आज जाणून घेण्यात आली आहेत, वेळप्रसंगी अधिक चर्चा करुन आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा 

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करुन पालखी सोहळ्याबाबत त्यांची मते जाणून घेतली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (व्हीसीद्वारे), आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया,  पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. तर व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग, सोलापूर जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, देहू संस्थानचे विश्वस्त माणिक मोरे, नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख संजय मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अँड. विकास ढगे-पाटील, अभय टिळक यांच्यासह राज्यभरातील वारकरी संप्रदायातील पालखी सोहळा प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.

(हेही वाचा : …तर 7 जूनपासून रायगडावरुन आंदोलन करू! संभाजी राजे छत्रपतींची घोषणा )

वारीबाबत येत्या आठवड्यात निर्णय!

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह पंढरपूरच्या आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात अनन्य साधारण महत्त्व आहे. या वारीला शेकडो वर्षांची पंरपरा आहे, मात्र राज्यात कोरोनाचे संकट आहे, कोरोनासोबतच म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अशा स्थितीत अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या सव्वा वर्षापासून आपण सर्व धार्मिक कार्यक्रम घरात राहूनच साजरे केले आहेत. आषाढी वारीची पंरपरा जपण्यासाठी आपण सर्वांनी मांडलेली भूमिका मंत्रिमंडळाच्या येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत मांडण्यात येईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत सर्वानुमते अंतिम निर्णय घेण्यात येईल. गेल्यावर्षी राज्य सरकारच्या आवाहनाला वारकरी संप्रदायाने चांगला प्रतिसाद दिला, ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थानच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.