अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पूल धोकादायक बनल्यानंतर मागील ७ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आला. मात्र, या पुलाची नव्याने बांधणी करण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात या पुलाचे बांधकाम सुरु होईपर्यंत हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरु ठेवण्यासाठी या पुलाच्या बांधकामाचे फेर स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची मागणी भाजपने केली. त्यानुसार आयआयटी मुंबई आणि व्हीजेटीआय या तांत्रिक सल्लागार संस्थांच्यावतीने याची पाहणी अहवाल तयार करून महापालिकेला सादर केला आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांच्या अहवालाचा अभ्यास महापालिकेच्या पुल विभागाच्यावतीने करून पुढील आठ दिवसांमध्ये हे पुल हलक्या वाहनांसाठी खुले ठेवावे किंवा नाही याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
( हेही वाचा : कोल्हापूरातील छोट्याशा गावातून आलेल्या २४ वर्षीय तरुणीचे अवयवदान)
अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पुल अतिधोकादायक असल्याचे जाहीर केल्यानंतर मागील सोमवारपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्थानिक आमदार अमित साटम व महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी पूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. या पाहणीमध्ये या पुलाचे पुन्हा एकद स्ट्रक्चरल ऑडीट करून अभिप्राय घेण्यात यावे. ज्यामध्ये या पुलाचे पाडकाम होईपर्यंत रिक्षा आणि दुचाकी वाहनांसाठी वापर करण्यास योग्य आहे का हे पडताळून पाहावे. जर या ऑडीट अहवालामध्ये या तीन चाकी व दुचाकी वाहनांची वाहतूक सुरु ठेवता येईल अशाप्रकारचा अभिप्राय आल्यास या पुलाचे पाडकाम होईपर्यंत ही वाहतूक सुरु ठेवली जावी, अशाप्रकारच्या सुचना पालकमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला केल्या आहेत.
त्यानुसार महापालिकेने आय आय टी मुंबई व व्हीजेटीआय या दोन संस्थांची निवड करून त्यांच्या माध्यमातून स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले असून याचा अहवाल या दोन्ही संस्थांनी महापालिकेला सादर केले आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांच्या पाहणी अहवालामध्ये काय निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे याचा अभ्यास महापालिकेच्या पूल विभागाच्यावतीने केला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही संस्थांच्या अहवालाच्या अभ्यास केल्यानंतर पुढील सात ते आठ दिवसांमध्ये पुढील निर्णय घेतला जाईल,असे महापालिकेच्या अधिकऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हे पुल हलक्या वाहनांसाठी खुले केले जाते की पादचाऱ्यांसाठी खुले ठेवले जाते हे आता येत्या आठ दिवसांमध्ये स्पष्ट होईल.
या पुलाच्या पाडकामासाठी रेल्वेने निविदा मागवली असून या पुलाचे पाडकाम मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात दोन मार्गिकेचे पाडकाम केले जाईल आणि दुसऱ्या टप्प्यात ऑगस्टला उर्वरीत दोन मार्गिकेचे पाडकाम केले जाईल. हे पाडकाम झाल्यानंतर गर्डर तयार करून दोन महिन्यांमध्ये एक मार्गिका मे २०२३च्या शेवटच्या टप्प्यात सुरु केले जाईल,असेही पुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community