मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक असलेल्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात हेमो डायलिसिस प्रमाण ५० टक्क्यांनी कमी केले आहे. जिथे दिवसाला ४० रुग्णांची डायलिसिस केली जायची, ती क्षमता वाढवण्याऐवजी २० एवढी करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी सेवा देणाऱ्या कंत्राटी तंत्रज्ञाना मागील नोव्हेंबर महिन्यापासून पगारच दिला नसून त्यामुळे त्यांनी एवढे दिवस बिनपगारी काम करत सेवा देण्याचा प्रयत्न केला, पण आता पगारच मिळत नसल्याने त्यांनी आता काम करण्यास नकार दिला. परिणामी या कंत्राटी तंत्रज्ञ अभावी हेमो डायलिलीसची सेवा कपात करण्याचा निर्णय नायर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने घेतला असून यामुळे डायलिसिससाठी येणाऱ्या रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे यंदा आरोग्य व्यवस्थेसाठी सुमारे ६ हजार कोटी रुपयांची तरतूद असलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नायर रुग्णालयाला केवळ कंत्राटी तंत्रज्ञ अभावी आपल्या रुग्णालयातील सेवा कमी करण्याची वेळ आली असून ही बाब नायर रुग्णालय व्यवस्थापन करता लांच्छनास्पद असल्याचे बोलले जात आहे.
मागील ०६ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने सात कंत्राटी डायलिसिस तंत्रज्ञांनी कामावर येण्यास असमर्थता दर्शवली आहे. या ०७ तंत्रज्ञांची काम करण्यास असमर्थता दर्शवल्याने नायर रुग्णालयातील डायलिसिसचे काम ०४ पाळ्या (शिफ्ट) ऐवजी ०३ शिफ्ट्सपर्यंत कमी करून डायलिसिसची संख्या ४० वरून २०पर्यंत कमी करण्यास भाग पाडले जात असल्याची देत नेफ्रोलॉजी विभागाच्या प्रमुखांनी १० एप्रिल २०२३ रोजी सर्व विभागाच्या प्रमुखांना पत्र पाठवून अवगत केले आहे. यामध्ये त्यांनी प्रकृती स्थिर असलेल्या सर्व डायलिसिस रुग्णांना डिस्चार्ज करा. तसेच खाट (बेड) रिकामी असल्याची खात्री होत नाही तोवर कोणत्याही नवीन रुग्णाला डायलिसिससाठी दाखल करू नका, असे नमूद केले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोविड काळात मुंबई महापालिकेने २१ कंत्राटी नर्स सह रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची भरती केली होती. परंतु मागील नोव्हेंबर २०२२ पासून या कर्मचाऱ्यांना पागर देणेच बंद केले असून यासाठी निधी मंजूर झाल्यास पगाराची रक्कम दिली जाईल असे गोड आश्वासन दिले जात होते. परंतु सुमारे १८ हजार पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या या कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय जास्त दिवस काम करणे शक्य झाले नाही. त्यातच नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता यांची भेट झाल्यानंतर पगाराची रक्कम कधी मिळेल याबाबत समाधानकारक उत्तर न देणे आणि रुग्णालयीन व्यवस्थापनातील अधिकारी या कर्मचाऱ्यांना उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने अखेर या कर्मचाऱ्यांनी काम करण्यास असमर्थता दर्शवली. याचा परिणाम कामावर झाला.
या २१ कर्मचाऱ्यांपैकी काही नर्स, डायलिसिस तंत्रज्ञ, तसेच इतर रुग्णालयीन कर्मचारी असून यांना प्रारंभी लसीकरणाच्या कामाला जुंपले होते आणि त्यानंतर यातील ७ कर्मचाऱ्यांना हेमो डायलिसिस विभागात डायलिसिस तंत्रज्ञ म्हणून त्यांची सेवा घेतली. कोविड काळापासून हे कर्मचारी सेवा देत असून आता कोविड संपला अशी करणे कारणे देत त्यांना देण्यात येणाऱ्या पगाराची रक्कम मंजूर झाला नाही म्हणून बेदखल करण्यात आले. कोविड काळात जीव धोक्यात घालून या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली. त्यांना नायर रुग्णलयाचे अधिष्ठाता अशाप्रकारे पुरस्कार देत आहे. कोविड काळात सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा पुढेही कायम ठेवली जाईल असे आश्वासन खुद्द महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी दिलेले असताना या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कम मंजूर करून न घेता नायर रुग्णालयाने गरज सरो, वैद्य मरो अशीच भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून करणारे हे कर्मचारी आज बेरोजगार झाले असून याच कर्मचाऱ्यांअभावी महापालिकेच्या या प्रमुख रुग्णालयाला डायलिलीस च्या शिफ्ट कमी करून डायलिसिस रुणांवरील उपचाराची संख्या निम्म्यावर आणण्याची नामुष्की ओढवली आहे. या रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि विभाग याला जबाबदार असून त्यांच्या निष्काळजीपणा मुळे डायलिसिसची संख्या कमी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार याप्रकरणी काय निर्णय घेतात याकडे इतर रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे.
Join Our WhatsApp Community