नेस्को कोविड केंद्रातील १ हजार ५०० नवीन रुग्णशय्यांचे लोकार्पण

१ हजार रुग्णशय्या प्राणवायू पुरवठा सुविधेसह, तर उर्वरित ५०० सर्वसाधारण रुग्णशय्या आहेत. प्रत्येक रुग्णशय्येनजीक पंखा, लॉकर व खुर्ची पुरवण्यात आली आहे.

गोरेगांव येथील नेस्को मैदानावरील मुंबई महपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या समर्पित भव्य कोविड आरोग्य केंद्रातील दुसऱ्या टप्प्यात दीड हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. याचे लोकार्पण सोमवारी करण्यात आले असून, यामधील एक हजार रुग्णखाटा या ऑक्सिजन प्रणालीला जोडलेल्या आहेत. त्यामुळे या सेंटरमधील एकूण रुग्ण खाटांची क्षमता आता ३ हजार ७०० एवढी झाली आहे.नेस्को मैदानातील महापालिकेच्या कोविड सेंटरमधील दुसऱ्या टप्प्यातील दीड हजार खाटांचे लोकार्पण राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते पार पडले. यावेळी अतिरिक्त आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, अधिष्ठाता (टप्पा-१) डॉ. (श्रीमती) नीलम अंद्रादे, अधिष्ठाता (टप्पा-२) डॉ. राजेश डेरे व अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. नितीन सलागरे यांची उपस्थिती होती.

१ हजार ५०० रुग्णशय्या कार्यान्वित

नेस्को कोविड केंद्रातील ‘ई’ सभागृहात एकूण १ हजार ५०० रुग्णशय्या कोविडबाधित रुग्णांवरील उपचारासाठी नव्याने कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये १ हजार रुग्णशय्या प्राणवायू पुरवठा सुविधेसह, तर उर्वरित ५०० सर्वसाधारण रुग्णशय्या आहेत. प्रत्येक रुग्णशय्येनजीक पंखा, लॉकर व खुर्ची पुरवण्यात आली आहे. आज २०० रुग्णशय्या कार्यान्वित करुन, या सभागृहातील सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. टप्प्या-टप्प्याने सर्व रुग्णशय्या कार्यान्वित केल्या जाणार आहेत.

(हेही वाचाः अंधेरी पाठोपाठ जोगेश्वरीतही भाजप नगरसेवकाच्या पुढाकाराने कोविड सेंटर!)

कोणत्या सुविधा असणार?

‘ई’ सभागृहात एकूण सहा कक्ष आहेत. प्रत्येक कक्षामध्ये २५० ते ३०० रुग्णशय्यांची क्षमता आहे. सर्व कक्षांमध्ये केंद्रीकृत वातानुकूलन सुविधा आहे. तसेच प्रत्येक कक्षामध्ये २ नर्सिंग स्टेशन, १ अन्न वितरण विभाग, १ अग्नि नियंत्रण कक्ष, समवेत २४ x ७ तत्त्वावर कार्यरत फार्मसी कौन्सिलिंग रुम, रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती पुरवण्यासाठी नियंत्रण कक्ष देखील आहे. एकूण ८ नोंदणी कक्ष, १ निरीक्षण कक्ष (१० रुग्णशय्या), १ क्ष-किरण विभाग कार्यान्वित करण्यात आले आहेत.

किती असणार मनुष्यबळ?

या नवीन सुविधेसाठी एकूण १ हजार १०० मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत. त्यात ५० सिनियर कन्सल्टंट, १६० निवासी वैद्यकीय अधिकारी, ३२० परिचारिका, ४८० रुग्णसेवा सहाय्यक आणि ९० तांत्रिक कर्मचारी वर्ग यांचा समावेश आहे.

(हेही वाचाः दिलासादायकः बोरीवली व वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम विभाग मायक्रो कंटेन्मेंट झोनमुक्त!)

नेस्को कोविड केंद्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण २ हजार २०० रुग्णशय्या कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये २०० एचडीयू रुग्णशय्या, तर ३०० प्राणवायू पुरवठा सुविधा असलेल्या रुग्णशय्या होत्या. दुसऱ्या टप्प्यातील १ हजार ५०० रुग्णशय्यांसह या केंद्राची एकूण क्षमता ३ हजार ७०० रुग्णशय्या इतकी झाली आहे. परिणामी, मुंबईतील कोविडबाधितांवरील उपचारांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here