विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर हे अनेक वर्ष घड्याळाच्या काट्यावर चालत असले तरीही शिवसेनेत आल्यावर त्यांच्या घड्याळाचे काटे मागेच पडत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार मध्ये शहराचे पालकमंत्री पद भूषवणाऱ्या दीपक केसरकर यांना सध्या वेळेच भान राहत नसून अनेकदा निश्चित केलेल्या बैठकांना ते तब्बल अडीच ते तीन तास उशिराने पोहोचत असल्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत. बुधवारी केसरकर यांनी महापालिकेत आढावा बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीला केसरकर हे तब्बल तीन तास उशिराने पोहोचले. त्यामुळे या बैठकीला दुपारी अडीच ते तीन वाजता बैठकीला पोहोचलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ताटकळत राहावे लागले. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या या अधिकाऱ्यांना गृहीत धरून चालण्याच्या भूमिकेमुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे नियोजन फसले जावून सरकारने सुचवलेल्या कामांना अशा पालकमंत्र्यांच्या लेट लतिफ धोरणामुळे विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. (Deepak Kesarkar)
राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारमध्ये शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मुंबई महापालिकेत दर बुधवारी विविध कामांसंदर्भात आढावा बैठक घेणे आणि जनता दरबार आयोजित करून पत्रकार परिषद घेणे असा कार्यक्रम जाहीर केला आहे. मागील काही दिवसांमध्ये केसरकर यांचे आढावा बैठक आणि जनता दरबार होत असले तरी जनता दरबार आणि आढावा बैठकांना केसरकर कधीच वेळेवर पोहोचले नाहीत.
(हेही वाचा – Subhash Chaudhary : नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी निलंबित)
पालकमंत्र्यांचा या आढावा बैठकीला अतिरिक्त आयुक्त तसेच शहर भागांतील सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, खात्यांचे प्रमुख अधिकारी वर्ग हा महापालिका मुख्यालय जमा होत असतात. बुधवारीही अशाच प्रकारे आढावा बैठक दुपारी साडेतीन वाजता आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकी करता दोन्ही परिमंडळाचे उपायुक्त, विभागांचे सहाय्यक आयुक्त आणि इतर संबंधित अधिकारी हे दुपारी अडीच ते तीन वाजताच वाजता उपस्थित राहिले होते. परंतु बैठकीची वेळ जवळ आल्यावर पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयातून बैठकीची वेळ सव्वा पाचची केली. परंतु पुन्हा कार्यालयात जावून बैठकीला येणे शक्य नसल्याने अधिकारी वर्ग हा तिथेच थांबला. पण त्यानंतर सव्वा पाच ऐवजी प्रत्यक्षात केसरकर हे सव्वा सहा वाजता तिथे पोहोचले आणि त्यानंतर सुरू झालेली बैठक रात्री आठ वाजेपर्यंत चालली होती.त्यामुळे दुपारी आलेल्या अधिकाऱ्यांना रात्री साडे आठ वाजेपर्यंत महापलिका मुख्यालयातच अडकून पडावे लागले. त्यामुळे दिवस भरात शहर भागातील प्रत्येक कार्यालयात सहायक आयुक आणि उपायुक्त यांची भेट घेण्यास आलेल्या जनतेची कामे झाली नाहीत. परिणामी गरीब जनतेला सहायक आयुक्त आणि उपायुक्त यांच्या भेटी अभावी निराश होवून परतावे लागले.
केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडून बैठकीला उशिरा येण्याचा हा प्रकार वारंवार होत असून त्यामुळे महापालिकेच्या अधिकारी वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. एका बाजूला सरकारच्या योजना, मोहीम राबविण्याचे आव्हान आणि दुसरीकडे विभागातील समस्या यांचे निराकारण करून विविध सेवा सुविधांची कामे हे तरतूद केलेल्या निधीतून ३१ मार्च पूर्वी करण्याचे आव्हान अशी अनेक प्रकारची आव्हाने आणि दबावाखाली कामे करणाऱ्या या अधिकाऱ्यांचा वेळ अशाप्रकारे वाया जात असेल तर या अधिकाऱयांनी कामे करायची कशी?सर्व सामान्य जनतेपेक्षा पालकमंत्री हे आपल्या दिमतीतच अधिकाऱ्यांना अडकवून ठेवत असल्याने केसरकर यांच्या विरोधातील नाराजी आता अधिक वाढली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जनतेची कामे करायची की केसरकर यांच्या सेवेत आणि त्यांच्या प्रतीक्षेत दिवस वाया घालवायचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Deepak Kesarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community