Veer Savarkar : वीर सावरकरांचा अवमान केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात दाखल खटल्याच्या तपासात दिरंगाई; सात्यकी सावरकरांचा गंभीर आरोप 

उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो, हे विसरता कामा नये, त्यामुळे आम्हाला न्याय देण्यात यावा, एकदा का न्याय मिळाला तर वीर सावरकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांची तोंडे बंद होतील, असे सात्यकी सावरकर म्हणाले.

235

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मागील वर्षी ब्रिटन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत त्यांचा अवमान केला होता. त्याविरोधात न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. मात्र त्याच्या तपासात पोलीस कमालीची दिरंगाई करत आहेत, असा गंभीर आरोप स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. हा खटला सात्यकी सावरकर यांनी स्वतः दाखल केला आहे. या पत्रकार परिषदेत अॅड. संग्राम कोल्हटकर, प्रा. शिवराज जोशी, राहुल भांगोंडे आणि डॉ. सचिन बोधनी हे उपस्थित होते.

काय म्हणाले सात्यकी सावरकर?

राहुल गांधी मार्च २०२३ मध्ये ब्रिटनमध्ये गेले होते, तेव्हा त्यांनी सावरकरांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा अवमान केला. त्यावेळी राहुल गांधी ‘वीर सावरकर (Veer Savarkar) यांचे ५-६ मित्र एका मुसलमान कैद्याला मारहाण करत होते, तेव्हा सावरकर यांना आनंद होत होता, असे स्वतः सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.’  वास्तविक अशी कुठलीही घटना घडली नाही आणि सावरकर यांनीही त्यांच्या पुस्तकात असे कुठेच लिहून ठेवले नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचा आरोप हा धादांत खोटा होता, असे सात्यकी सावरकर म्हणाले.

तसेच सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते हा आरोपही राहुल गांधी यांनी केला होता. वस्तुतः वीर सावरकर यांना निर्वाह भत्ता मिळत होता, जो सगळ्या कैद्यांना मिळत होता, मात्र सावरकर (Veer Savarkar) यांना त्यांच्या तुलनेत फारच कमी केवळ महिना ६० रुपये मिळत होता. त्यामुळे हा आरोपही खोटा आहे, असेही सात्यकी सावरकर म्हणाले.

(हेही वाचा Swatantra Veer Savarkar : दिल्लीकरांसाठी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाच्या खास शोचं आयोजन, अभिनेते रणदीप हुड्डा यांची विशेष उपस्थिती)

वीर सावरकर  (Veer Savarkar) यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती, असेही राहुल गांधी म्हणाले होते. यातही तथ्य नाही. कारण सावरकर यांनी माफीनामा नव्हे तर आवेदन पत्रे लिहिली होती आणि त्यातही त्यांनी स्पष्ट म्हटले होते की, आपण माझी शिक्षा माफ केली नाही तरी चालेल पण माझ्या सहकाऱ्यांची शिक्षा माफ करावी. असे असतानाही राहुल गांधी यांनी बिनबुडाचे आरोप केले. म्हणून राहुल गांधी यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला, असे सात्यकी सावरकर म्हणाले.

…तरच वीर सावरकरांवर आरोप करणाऱ्यांची तोंडे बंद होतील 

हा खटला दाखल करून त्याला वर्ष पूर्ण झाले तरी केवळ तक्रारदाराचे म्हणणे आणि साक्षीदारांचे म्हणणे नोंदवून घेणे इतकेच करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास भादंवि कलम २०२ अंतर्गत सुरु आहे. पोलिसांनी वर्षभरापूर्वी आम्ही या प्रकरणी यूट्यूबची लिंक मिळावी म्हणून यूट्यूबशी संपर्क करत आहोत, मात्र पोलीस यूट्यूब त्यांना सहकार्य करत नसल्याचे सांगत आहे. २ दिवसांपूर्वी न्यायालयात यावर सुनावणी झाली, तेव्हाही पोलिसांनी हेच कारण दिले. यावरून या प्रकरणाचा तपास हा केवळ यूट्यूबच्या लिंकवर अवलंबून आहे का? आम्ही तर वर्तमानपत्रातील वृत्तांचा पुरावा सादर केलेला आहे. मग पोलीस युट्युब लिंकच्याच मागे का लागले आहेत? यावरून एकतर युट्युब पोलिसांना सहकार्य करत नसावे अथवा राहुल गांधी यांच्याभोवती जे राजकीय वलय आहे त्यामुळे पोलीस तपासात दिरंगाई करत आहेत का? असे संशय आम्हाला येत आहेत. आता न्यायालयाने पोलिसांना २७ मेपर्यंत यूट्यूबच्या लिंकचा तपास करण्याचा आदेश दिला आहे. हा खटला मानहानीचा आहे. वस्तूत उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो, हे विसरता कामा नये, त्यामुळे आम्हाला न्याय देण्यात यावा, एकदा का न्याय मिळाला तर वीर सावरकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांची तोंडे बंद होतील, असे सात्यकी सावरकर म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.