गेल्या काही दिवसांपासून देशातील काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 16 हजार 299 नवे रुग्ण आढळूनआले. राजधानी दल्लीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आता दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
दिल्लीत आता सार्वजनिक ठिकाणी पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही दिल्ली सरकारकडून देण्यात आले आहेत.
दिल्ली सरकारचा निर्णय
दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारीच्या दृष्टीकोनातून दिल्ली सरकारने मास्कसक्तीचा निर्णय घेतला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणा-या नागरिकांना 500 रुपयांचा दंड देखील भरावा लागणार आहे. खासगी चारचाकी गाडाने प्रवास करणा-या नागरिकांना मात्र मास्कसक्ती करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्ली सरकारने प्रशासनाला दिले आहेत.
दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ
राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांमध्ये 2 हजार 146 नवे रुग्ण आढळून आले असून, आठ जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. मंगळवारी दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 2 हजार 495 इतकी होती. दिल्लीत कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढून 15.41 टक्के झाला आहे. ओमायक्रॉनच्या बीए.2 आणि बीए.5 व्हायरसचे सब व्हेरिएंट आढळून येत असल्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे सांगण्यात येत असेल.
Join Our WhatsApp Community