रिपोर्ट – नित्यानंद भिसे
मुंबई – फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीत झालेल्या जातीय दंगल प्रकरणी दिल्ली पोलिसांनी नुकतेच अतिरिक्त आरोपपत्र दाखल केले असून त्याप्रमाणे अटक सत्रही सुरु केले आहे. ज्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डाव्या विचाराच्या विद्यार्थी संघटनेचा नेता, ‘युनायटेड अगेन्स्ट हेट’चा सदस्य उमर खालिद याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर अतिरिक्त आरोपपत्रात माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी, दिल्लीतील आम आदमी पक्षाचे माजी नेते तसेच स्वराज्य अभियानचे विद्यमान नेते योगेंद्र यादव, दिल्ली विद्यापिठाचे प्राध्यापक, मानवाधिकार कार्यकर्ते अपूर्वानंद, तथाकथित अर्थतज्ञ प्रा. जयंती घोष, माहितीपट निर्माते राहुल रॉय यांच्या नावांचा समावेश केला. यामुळे दिल्ली दंगल म्हणजे महाराष्ट्रातील भीमा-कोरेगाव दंगलीस कारणीभूत ‘एल्गार परिषदे’ची पुनरावृत्ती होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्र सरकारच्या ‘नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एन्.आर्.सी.) या कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्ली दंगल घडवण्यात आली होती. हि भीषण दंगल पूर्वनियोजित होती ज्यामध्ये ५३ लोकांचा मृत्यू झाला, तर ५८१ जण जखमी झाले होते. केंद्र सरकारची प्रतिमा मालिन करण्यासाठी आरोपपत्रात ज्यांची नावे आली आहेत त्या सर्वानी सीएए आणि एनआरसी या कायदयांना विरोध करण्यासाठी मुस्लिम समुदायाला भडकावले. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी कोणत्याही थराला जा, अशा शब्दांत मुस्लिम समुदायाला चिथावण्यात आल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे.
उमर खालिदवरील आरोप
आपचा विद्यमान नगरसेवक ताहिर हुसेन हा या दंगलीमागचा मुख्य सूत्रधार होता, जो सध्या गजाआड आहे. आता दिल्लीतील वादग्रस्त जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशद्रोही घोषणा देणारा उमर खलिद यालाही दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. उमर खालिदच्या विरोधात गुन्हा दाखल करणारे पोलीस उप निरीक्षक अरविंद कुमार यांनी एफआयआर मध्ये म्हटले कि, खालिदने दंगल भडकण्याआधी दोन निरनिराळ्या ठिकाणी चिथावणीखोर भाषण केले. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर आले, तेव्हा भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन करण्यासाठी त्याने मुस्लिम समुदायाला रस्त्यावर येऊन रस्ते बंद करण्यास सांगितले. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने मागील महिन्यात आपचा नगरसेवक ताहिर हुसेन यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले, त्यात दंगलीच्या आधी ८ फेब्रुवारी रोजी हुसेनने उमर खालिद आणि ‘युनायटेड अगेन्स्ट हेट’चे खालिद सैफी यांची भेट घेतल्याचे म्हटले आहे. याच भेटी दरम्यान खालिदने ताहीर हुसेन याला आपण स्वतः आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हि दंगल भडकावण्यासाठी अर्थ साहाय्य करू, असे आश्वासित केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.
डाव्या आणि साम्यवादी नेत्यांचे संघटित कारस्थान
दिल्ली पोलिसांनी दिल्ली दंगल प्रकरणी दाखल केलेल्या अतिरिक्त आरोपपत्रात माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी, दिल्लीतील आम आदमी पक्षाचे माजी नेते तसेच स्वराज्य अभियानचे विद्यमान नेते योगेंद्र यादव, दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक, मानवाधिकार कार्यकर्ते अपूर्वानंद, तथाकथित अर्थतज्ञ प्रा. जयंती घोष, माहितीपट निर्माते राहुल रॉय यांच्यासह आपचे आमदार अमानदुल्ला खान, भीम आर्मीचे प्रमुख चंद्र शेखर, वकील मेहमूद बुराचा, माजी आमदार मतीन अहमद या सर्वांची नावे या आरोपपत्रात समाविष्ट आहेत. पोलिसांनी या दंगलप्रकरणी अटकेत असलेल्या तीन विद्यार्थिनींच्या कबुली जबाबावरून हि नावे आरोपपत्रात घेतली आहेत. जेएनयूच्या विद्यार्थीनी देवांग कलिका, नताशा नरवान आणि जामिया मिलिया इस्लामियाची गुलफिशा फातिमा अशी या विद्यार्थिनींची नावे आहेत. या तिघीवर या दंगलप्रकरणी गंभीर आरोप आहेत. त्यामुळे दिल्ली दंगल म्हणजे ‘सेक्युलॅरिस्ट’, ‘इस्लामिस्ट’ आणि ‘कम्युनिस्ट’ या शक्तींचे संघटित कट कारस्थान होते, हे स्पष्ट झाले आहे.